“त्या मला सांगायच्या की त्या गायला लागल्या की व्यवस्थापनाचे लोक गुरुद्वारेतले स्पीकर बंद करून टाकायचे. त्यांची ढोलकी आवाराच्या बाहेर ठेवून द्यायचे,” नरिंदर कौर सांगतात. गुरदासपूरच्या कह्नुवाँमधून स्थलांतरित होऊन त्या गेली ४१ वर्षं दिल्लीमध्ये राहत आहेत.

६३ वर्षीय नरिंदर यांचं किर्तनिया म्हणून दिल्लीमध्ये बरंच नाव आहे. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथातलं संगीत त्या गातात आणि शीख महिलांना शिकवतात. या संगीताला शबद कीर्तन म्हणतात आणि गुरुद्वारांमध्ये आणि परिसरात ते गायलं जातं.

त्या गाण्यात माहिर असल्या तरीही इतर शीख स्त्रियांप्रमाणे त्यांना देखील गुरुद्वारांमध्ये आपल्या गायनकौशल्याची दखल घेतली जावी यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

२०२२ साठी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने गुरुद्वारांमध्ये गायन सादर करणारे, वाद्यं वाजवणारे साथीदार आणि गुरुद्वारांमध्ये गुरु ग्रंथ साहिबमधली वचनं वाचणाऱ्यांची एक यादी प्रसिद्ध केली. या यादीतील ६२ रागी आणि धाडींमध्ये एकही महिला नाही. कवींची स्थिती बरी म्हणायला पाहिजे कारण २० जागांपैकी ८ स्त्रियांना दिल्या आहेत.

“दिल्लीतल्या गुरुद्वारांमध्ये मला गाण्याची संधी मिळाली त्याला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल,” बीबी रजिंदर कौर सांगतात. २०२२ च्या सुरुवातीला त्यांची कवी म्हणून नेमणूक करण्यात आली.

डावीकडेः कीर्तन स्पर्धांमध्ये गाणं सादर करण्यासाठी नरिंदर कौर स्त्रियांचा जथा तयार करतात. फोटोः हरमन खुराणा. उजवीकडेः दिल्ली फतेह दिवस कार्यक्रमामध्ये नरिदंर कौर आणि त्यांच्या जथ्यातल्या इतर स्त्रिया गाणं सादर करतायत. साभारः नरिंदर कौर

शीख धर्माची मूळ तत्त्वं ‘सिख रेहत मर्यादा’ म्हणून ओळखली जातात. शीख धर्म स्वीकार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला गुरुद्वारेत कीर्तन सादर करता येतं. यामध्ये स्त्री-पुरुष असा भेद केलेला नाही. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी ऐतिहासिक गुरुद्वारांचं व्यवस्थापन पाहणारी सर्वोच्च संस्था आहे. त्यांनी देखील स्त्रियांना समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यांचा आदेश पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदिगढमधल्या गुरुद्वारांना बंधनकारक आहे.

इतका जोरदार पाठिंबा असूनही शीख समुदायातील अनेकांचा गुरुद्वारांच्या धार्मिक कार्यात स्त्रियांना सहभागी करून घ्यायला विरोध आहे. आणि त्यामुळेच कीर्तनकार स्त्रिया पडद्याआडच राहतात.

या लिंगभेदाबद्दल कीर्तनकार जसविंदर कौर प्रश्न विचारतात, “भक्ती असणाऱ्या, व्यवस्थित शिकलेल्या स्त्रिया गोल्डन टेंपलच्या म्हणजेच हरिमंदिर साहिबच्या आवारातल्या बाकी गुरुद्वारांमध्ये गाऊ शकतात, मग मेन हॉलमध्ये त्या का गाऊ शकत नाहीत?” कौर नवी दिल्लीच्या सुंदरी कॉलेजमध्ये गुरमत संगीताच्या प्राध्यापक आहेत. गुरमत संगीत शीख धर्माइतकीच जुनी संगीत परंपरा आहे.

स्त्रिया हरिमंदिर साहिबच्या मेन हॉलमध्ये कीर्तन सादर करू शकत नाहीत. शीख धर्मीयांसाठी ही गुरुद्वारा सर्वात पवित्र मानली जाते. या मुद्द्यावर नेत्यांनी मिठाची गुळणी धरणं पसंत केलं आहे. अगदी प्रबंधक समितीच्या अध्यक्षपदी बीबी जागीर कौर असताना देखील. २००४-०५ मध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला होता आणि स्त्रियांना कीर्तन सादर करण्यासाठी निमंत्रण दिल्याचं म्हटलं जातं. मात्र आलेल्या अर्जांपैकी कोणीच त्या दर्जाचं नसल्याने तो विषय तिथेच संपल्याचं त्या सांगतात.

त्यांच्या या निर्णयाला शिखांचे दहावे गुरू गुरु गोबिंद सिंग यांनी स्थापन केलेल्या रुढीप्रिय दमदमी टकसाल या गटानेही विरोध केला होता. गुरु गोबिंद सिंग यांनी सर्वप्रथम शिखांसाठी काही नियम घालून दिले. टकसालचं असं मत आहे की स्त्रियांना हरिमंदिर साहिबमध्ये गाण्याची परवानगी दिली तर परंपरेचा अवमान होईल. गुरूंच्या काळात केवळ पुरुषच आतमध्ये कीर्तन करायचे तेव्हापासून तशीच परंपरा पाळली जात आहे.

या आधीही ही परिस्थिती बदलावी म्हणून अनेकदा प्रयत्न झाले आहेत. अगदी १९४० मध्ये धर्माची दीक्षा घेतलेल्या शीख स्त्रियांना कीर्तन करण्याचा अधिकार आहे असा निर्णय शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने घेतला होता. आणि अलिकडे, १९९६ साली अकाल तख्तच्या एका हुकुमनाम्यात याला दुजोरा दिला गेला होता. तरीही लिंगभेद सुरूच आहे.

२०१९ साली नोव्हेंबर महिन्यात पंजाब विधानसभेने एक ठराव पारित केला. याद्वारे हरिमंदिर साहिबच्या मुख्य हॉलमध्ये स्त्रियांना कीर्तन करू द्यावं अशी विनंती अकाल तख्त आणि शिरोमणी प्रबंधक समितीला करण्यात आली. पण हा ठराव पारित होण्याआधी शासन धार्मिक बाबीत ढवळाढवळ करत असल्याचा दावा करत या निर्णयाला खूप विरोध झाला होता. 


लग्नाआधी सिमरन कौर होशियारपूर जिल्ह्यातल्या सोहियाँ गावात गुरू रविदासजी गुरुद्वारेत आपल्या महिला साथीदारांसोबत कीर्तन करायची. २७ वर्षीय सिमरन गावातल्या संत बाबा मीहान सिंग जी गुरुद्वारेत रोज नेमाने जायची. तिथे महिला कीर्तन गायच्या आणि त्यात कुणाला काही वावगं वाटलं नव्हतं. छोट्या गुरुद्वारा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीशी संलग्न नसतात. त्यांचं व्यवस्थापन आणि एकूण कारभार नियमात जास्त बांधलेला नसतो.

“गावांमध्ये गुरुद्वारेची सगळी व्यवस्था बहुतेक करून स्त्रियाच पाहतात. पुरुष मंडळी सकाळी कामाला जातात. गुरुद्वारेत जे कुणी सगळ्यात आधी पोचेल ते कीर्तन सुरू करतात,” सिमरन सांगते.

आता सगळ्या गावांमध्ये अशीच स्थिती असेल असं नाही. पण हरमनप्रीत कौरचा अनुभव पाहिला तर बदलाचे वारे वाहू लागलेत असंच म्हणावं लागेल. १९ वर्षांची हरमनप्रीत तरन तारन जिल्ह्याच्या पट्टीमधली अगदी तरुण कीर्तनकार आहे. तिने तिच्या गावातल्या बीबी रजनी जी गुरुद्वारेत स्त्रियांना कधीच कीर्तन करताना पाहिलं नव्हतं. तिचे वडील गुरुद्वारेमध्ये सेवा म्हणून गुरु गोबिंद साहिबचं पठण करायचे. त्यांनीच तिला कीर्तन काय असतं ते शिकवलं. आता ती विशेष काही कार्यक्रम असले तर तिथे कीर्तन करते.

डावीकडेः सिमरन कौर यांची मावशी २००६ साली गुरु रविदास जयंतीला आपल्या मुलीबरोबर कीर्तन करतीये. साभारः जसविंदर कौर. उजवीकडेः लग्न झालं आणि सिमरनचा कीर्तनाचा सराव मागे पडला. पण आता जवळच्या गुरुद्वारेमध्ये पुन्हा एकदा कीर्तनाला सुरुवात करावी अशी तिची इच्छा आहे. फोटोः जसविंदर कौर

इथून १०० किलोमीटरवर पठाणकोट शहरात दिलबाग सिंग, वय ५४ सांगतात की इथल्या गुरुद्वारा गुरु सिंग सभामध्ये दर शनिवारी काही तास पठाणकोटच्या स्त्रिया कीर्तन आणि शबद गातात. उत्सवामध्ये स्त्रियांचे अनेक जथे इथे येतात आणि त्यांची सेवा सादर करतात.

२५ वर्षांच्या सुखदीप कौरने पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठातून शीख पंथ अभ्यास आणि धार्मिक अभ्यास अशा दोन विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. ती संगरुर जिल्ह्यात्या लसोई गावी राहते. स्त्री पुरुषांमध्ये जी सत्तेची उतरंड आहे त्यासाठी फक्त पुरुषांना दोष देणं तिला मान्य नाही. तिचं असं म्हणणं आहे की स्त्रियांना गुरुद्वारेत पूर्ण वेळ कुठलीही जबाबदारी घेणं अवघड असतं. तिच्या मते “कीर्तन किंवा शबद गाण्यापेक्षा त्या घरदार आणि मुलंबाळांकडे लक्ष देतील ना.”

नरिंदर कौर यांची मात्र खात्री आहे की स्त्रिया सगळ्या गोष्टी सांभाळू शकतात. २०१२ साली त्यांनी गुरबानी विरसा संभाल सत्संग जथा सुरू केला. ज्या स्त्रियांना काही रोज काही तास काढणं शक्य आहे, ज्यांना गुरुद्वारेत कीर्तन गायचं आहे अशांना एकत्र आणण्याचा त्यांचा हेतू होता. “त्या त्यांचं घर, मुलं सगळं काही सांभाळतायत. त्या करतात ती सेवा सिंग [शीख पुरुष] लोकांच्या दुप्पट असते,” त्या म्हणतात.

शीख अल्पसंख्याक महाविद्यालयांमधल्या डिव्हिनिटी सोसायटींमधून शीख विद्यार्थी गुरमत संगीताचे पहिले धडे गिरवतात. २४ वर्षीय काजल चावला आता किरपा कौर म्हणून ओळखली जाते. तिने २०१८ साली दिल्ली विद्यापीठाच्या गुरु गोबिंद सिंग कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असताना ती कॉलेजमधल्या विसमाद डिव्हिनिटी सोसायटीची सक्रीय सदस्य होती. अजूनही ती त्यांच्या संपर्कात आहे. ती सांगते, “आमच्या सोसायटीच्या सदस्यांची पार्श्वभूमी फार वेगवेगळी आहे. त्या सगळ्यांना इथे कीर्तन, कविता आणि गायनाचं शिक्षण मिळतं. कॉलेजच्या विविध कार्यक्रमांमुळे आमची चांगली तयारी होते आणि आमचा आत्मविश्वास वाढायलाही मदत होते.”

डावीकडेः २५ वर्षीय सुखदीप कौरला कथावाचक (शीख धर्माच्या ऐतिहासिक कथांचं पारायण करणारी व्यक्ती) व्हायचं आहे. साभारः सुखदीप कौर. उजवीकडेः सिमरजीत कौर फरीदाबादमध्ये तिच्या संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवते. साभारः सिमरजीत कौर. खालीः नरिंदर कौर आणि त्यांचा जथा यात्रा हुजुर साहिबमध्ये कीर्तन सादर करतोय. साभारः नरिंदर कौर

“जो ज्यादा रियाझ करेगा वह राज करेगा,” २४ वर्षीय बक्शंद सिंग म्हणतो. तो दिल्ली विद्यापीठाच्या एसटीजीबी खालसा कॉलेजमध्ये डिव्हिनिटी सोसायटीसाठी तबला वाजवायचा. इथले विद्यार्थी दिल्लीमधील विविध गुरुद्वारा आणि कार्यक्रमांमध्ये कीर्तन गायन सादर करतात. कार्यक्रमांसाठी इतर राज्यांमध्ये देखील जातात.

पण या तरुण शीख मुलांमध्ये भरपूर उत्साह असला तरी त्यामुळे त्यांची पत वाढते किंवा त्यांच्या कलेला मान मिळतोय असं मात्र काहीच घडत नाही. “किती तरी स्त्रिया गुरुद्वारांमध्ये कीर्तन करतात पण रागी किंवा ग्रंथी म्हणून कुणाची नेमणूक झालेली मी तरी पाहिलेली नाही,” ५४ वर्षीय चमन सिंग सांगतात. ते दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे माजी सदस्य आहेत. स्त्रियांना कारकुनी किंवा हिशेबाची कामं दिली जातात किंवा लंगरमध्ये स्वयंपाकाची. कीर्तनकारांना दर महिना ९,००० ते १६,००० रुपये पगार मिळतो.

“सगळी सत्ता गुरुद्वारांच्या प्रबंधक समित्यांच्या हातात आहे. ते जेव्हा गुरुपुरब [उत्सव] किंवा समागम [खाजगी धार्मिक कार्यक्रम] आयोजित करतात तेव्हा तरुण मुलं-मुली किंवा स्त्रियांना बोलवायचं सोडून अजूनही ते प्रस्थापित रागी लोकांनाच निमंत्रित का करतात?” दिल्लीची परमजीत कौर विचारते.

३२ वर्षीय परमजीतने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं असून पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठातून गुरमत संगीत विषयात एमए केलं आहे. इतर तरुण मुलींप्रमाणे तिचा आवाजही आता लोकांपर्यंत पोचला आहे. खरं तर सगळ्याच गुरुद्वारांमध्ये, मंदिरांमध्ये स्त्रियांचा आवाज घुमतोय हा दिवसही आता फार काही दूर नाही.

ਭੰਡਹੁ ਹੀ ਭੰਡੁ ਊਪਜੈ ਭੰਡੈ ਬਾਝੁ ਨ ਕੋਇ ॥

ਨਾਨਕ ਭੰਡੈ ਬਾਹਰਾ ਏਕੋ ਸਚਾ ਸੋਇ ॥

बाईच्या शरीरातूनच जन्म घेते बाई

तीच नसली तर कुणीच असणार नाही.

या पंक्ती गुरु ग्रंथ साहिबमध्ये मेहला १ मधल्या असून आसा रागात निबद्ध आहेत.

पारी होमपेजवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

Editor's note

हरमन खुराणा हिने मुंबईच्या सोफाया कॉलेज फॉर विमेन येथून सोशल कम्युनिकेशन मीडिया या विषयात पदवी प्राप्त केली आहे. शीख धार्मिक संस्थांमध्ये स्त्रियांची भूमिका समजून घेण्याचं एक माध्यम म्हणून तिने हा प्रकल्प हाती घेतला.

ती म्हणते, “समतेच्या पायावर उभ्या झालेल्या संस्थांमध्ये देखील लिंगभेद कसे शिरतात याचे अनेक बारकावे मला या वार्तांकनातून समजू शकले. पत्रकारिता आणि चित्रपट निर्मिती या दोन्ही गोष्टींवर एकाच वेळी काम करताना मला मजा आली. मीच वार्ताहर आणि मीच कॅमेरा पाहत होते. या विषयाबद्दल कळकळ असलेल्या अनेक स्त्रियांशी मला मनमोकळा संवाद साधता आला. त्यांच्या धारणाच मी या संपूर्ण प्रवासात पुढे आणण्याचा प्रयत्न करत होते.”

अनुवादः मेधा काळे

पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवाद आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.