कबीर मानला कायमच आपली ओळख पुरुष असावी असं वाटत आलंय. त्याला आठवतंय तेव्हापासून. हे फोटो त्याच्या वडलांनी काढलेत. वंदना बन्सलने या लेखासाठी ते संग्रहित केले आहेत.

मला आठवतं तेव्हापासून मला बदलायचं होतं – [जन्माने] मुलगी असलो तरी मला एक पुरुष व्हायचं होतं. २०१४ साली, वयाच्या २४ व्या वर्षी मी माझं नाव बदललं. १५ व्या शतकातले संतकवी कबीर दास यांच्यावरून मी माझं नाव कबीर ठेवलं. आता मला कुणीही ‘मनीषा’ म्हणून हाक मारायची नाही. जन्मानंतर माझ्या आईवडलांनी माझं नाव मनीषा ठेवलं होतं. आणि आमच्या आडनावावरून आम्ही बलई समाजाचे, दलित आहोत ते समजतं म्हणून मी त्या ऐवजी ‘मान’ हे आडनाव धारण केलं. मला घरी लाडाने सगळे ‘मानी’ म्हणायचे, त्यावरून.

[सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या] ट्रान्सजेन्डर व्यक्तींसाठी असलेल्या पोर्टलवर मला अधिकृतरित्या माझं नाव बदलता येऊ शकतं हे नुकतंच मला समजलंय. २९ सप्टेंबर, २०२० रोजी हे पोर्टल सुरू करण्यात आलंय आणि त्यावर माझ्यासारख्या लोकांना एक ओळखपत्र मिळू शकतं. मी अर्ज केलाय, पण त्यावर अजून काहीच प्रक्रिया झालेली नाहीये. मी पाठपुरावा केला तर पोर्टल चालू नाहीये. पण मी वाट पाहतोय. होईल तेव्हा होईल.

मी मोठा होत होतो तेव्हा ‘मनीषा’ असणं मला बरोबर वाटायचंच नाही. मी अगदी लहान होतो तेव्हासुद्धा मला मुलींचे कपडे घातले की कसं तरी व्हायचं. त्यामुळे मी नेहमी पँट आणि शर्ट घालायचो. इतर मुलींसारखे मी कधी केसही वाढवले नाहीत. माझे केस कायम छोटे असायचे. मी किशोरवयात आलो तरी माझी पाळी सुरू झाली नव्हती. खरं तर मला इतकं बरं वाटलं होतं. पण माझ्या आईनी मला स्त्रीरोगतज्ज्ञाकडे नेलं आणि पाळी येण्यासाठी औषधं सुरू केली.

१७ वर्षांचा असताना एकदा मी एक सायकल भाड्याने घेतली आणि शाळा सुटल्यानंतर चार किलोमीटरवरच्या एका सायबर कॅफेमध्ये गेलो. ‘स्त्रीचा पुरुष होण्यासाठी ऑपरेशन’ बद्दल मला ऑनलाइन माहिती शोधायची होती. मला माझा प्रश्न नीट टाकता आला नसला तरी सर्च इंजिननी माझ्या मनातली भावना ओळखली आणि या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या अनेक प्लॅटफॉर्म माझ्यासाठी खुले केले.

किशोरवयात माझं रोजचं जगणं अजिबात सोपं नव्हतं. उदा. शाळेत मुलींच्या बाथरुममध्ये जाणं अशक्य होतं. त्यामुळे घरी परतेपर्यंत मी लघवीला जायचोच नाही. आणि याचा परिणाम म्हणजे मला दोनदा मूत्रमार्गाचा संसर्ग झाला. त्याच्या उपचारावर एकूण ४०,००० रुपये खर्च झाले. अजूनही मी सार्वजनिक शौचालयांचा वापर करत नाही. घरी येईपर्यंत मी हे आवेग रोखून धरतो. मला वाटायचं की मी जर पुरुषात रुपांतरित झालो तर या सगळ्या समस्या संपून जातील.

मुलगी म्हणून जन्म झाला असला तरी ती ओळख मान्य करून जगणं त्याच्यासाठी कठीण होतं. आणि आज ट्रान्स पुरुष ही ओळख देखील तितकीशी सोपी नाही. फोटोः वंदना बन्सल

कौटुंबिक आयुष्य

फाळणीच्या वेळी माझे आजीआजोबा राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून दिल्लीला आले आणि किशन गंज भागात वास्तव्य करू लागले. गावी त्यांची शेती होती पण इथे शहरात माझ्या आजोबांनी दिल्ली क्लॉथ मिल्समध्ये काम करायला सुरुवात केली. माझे वडील, यशवंत एक स्वतंत्र छायाचित्रकार होते आणि त्यांना अधूनमधून लग्नात फोटो काढण्याचं काम मिळायचं. पण ते बहुतेक वेळा कामावर जायचेच नाहीत आणि पिऊन घरीच बसलेले असायचे.

माझी आई सरला ही आमच्या घरातली एकमेव कमावती व्यक्ती होती. ती सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची. तिला महिन्याला ३०,००० रुपये पगार मिळायचा. ती दररोज किशनगंज मधल्या आमच्या घरून ओखलामधल्या तिच्या शाळेत जायची – येऊन जाऊन सहा तास बस प्रवास करून.

माझे वडील म्हणजे खरं तर आमच्या घरातले खलनायक होते. आमच्या घरी मी किती वेळा मारहाण आणि अत्याचार पाहिलेत. असं असलं तरी त्यांच्यामध्ये जी कला होती ना त्याचं मला सुप्त कौतुक होतं. त्यांनीच मला विविध कला, संगीत आणि सिनेमाची गोडी लावली. मी त्यांच्या कॅमेऱ्यातले रोल बदलायचो ते मला अजूनही लक्षात आहे. त्यांनीच माझे सगळे फोटो काढलेत. त्यांनी पहिला मुलगा हवा होता की काय माहित नाही, पण त्यांनी मला कधी मुलीसारखं वागवलंच नाही.

‘टॉमबॉय’

मी पाच वर्षं (इयत्ता ६ वी ते १० वी) कन्याशाळेत होतो. आणि तिथे माझा जीव घुसमटून जायचा. अकरावीत मी मुला-मुलींच्या कॉलेजमध्ये गेलो आणि तेव्हा कुठे गोष्टी जरा सुखद झाल्या. ही शाळा म्हणजे माझ्यासाठी घरून सुटका करून घेण्याची जागा होती. मी मुलींच्या टीममध्ये होतो आणि मला खेळायला फार आवडायचं. तिथे मी कसा होतो यावरून कुणी मला जोखायचं नाही.

कबीरने गेल्या वर्षी संप्रेरक उपचार सुरू केले आहेत आणि आता त्याच्या चेहऱ्यावर केस यायला लागलेत. पुढच्या वर्षी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेण्याचा त्याचा मानस आहे. फोटोः वंदना बन्सल

माझ्या शाळेतली एक मुलगी आणि मी प्रेमात पडलो. तिला आपण सोनाक्षी म्हणू या. एक दिवस तिने आमचं नातं संपवलं. ती म्हणाली, “हे आपलं काय सुरू आहे? आपलं कधी तरी लग्न होईल का?” माझ्या मनात स्वतःची जी ओळख होती आणि प्रत्यक्षात मी जसा होतो त्यामुळे मला खूप अस्थिर, विचलित वाटायला लागलं आणि मी नैराश्यात गेलो.

शाळा संपली आणि मी माध्यम विषयात पदवी घेण्यासाठी दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मी तिथे माझी ओळख ट्रान्स पुरुष म्हणून उघड केली नव्हती. मी ‘टॉमबॉय’ मनीषा म्हणूनच जगत होतो. तेव्हा कसल्याच चिंता नव्हत्या. पण हे दिवस फार काळ राहिले नाहीत. माझ्याबद्दल कसल्या कसल्या अफवा पसरू लागल्या. मी माझ्या एका मित्राबरोबर त्याच्या मोटारसायकलवरून कॉलेजला जायचो. तो माझा बॉयफ्रेंड असल्याच्या वावड्या उठल्या. बाकी कोणी म्हणायचं की मी मुलींबरोबर डेटिंग करतोय. मी भिन्नलिंगीही नाही आणि समलिंगीही नाही. पण या सगळ्या चर्चांचा मला खूप त्रास व्हायला लागला. समाजाकडून येणारा हा दबाव मला सहन झाला नाही आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षात [२०१५] मी कॉलेज सोडलं.

घरीसुद्धा परिस्थिती फारशी ठीक नव्हती. माझ्या वडलांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. माझ्या आईने तिची सगळी पुंजी त्यांच्या उपचारावर खर्च केली, पण आम्ही काही त्यांना वाचवू शकलो नाही. आम्हाला आमच्या नातेवाइकांकडून पैसे उसने घ्यावे लागले. हॉस्पिटल आणि औषधपाण्यावर आम्ही तब्बल ३५ लाख रुपये खर्च केले असतील. आईचे प्रॉव्हिडंट फंडात पैसे होते आणि शासकीय शाळेत शिक्षिका असल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक लाभ मिळायचे. असं सगळं असूनही आम्ही पुढची सहा वर्षं आमच्यावरचं कर्ज फेडत होतो.

आपल्या समाजात केवळ मुलगेच अंत्यसंस्कार करू शकतात. पण माझे वडील गेल्यानंतर इतर तीन जणांसोबत मीदेखील त्यांना खांदा दिला होता. सरणापाशी माझ्या चुलत्यांनी आक्षेप घेतला आणि ते म्हणाले, “मनीषा विधी करू शकत नाही.” पण माझा चुलत भाऊ म्हणाला, “लडकी कहीं और से नही आती.” ते विधी केले तेव्हा मला आतून खूप बळ आलं.

सध्या, आता

२०१९ साली मी कुरुक्षेत्र विद्यापीठात पहिल्या वर्षाची परीक्षा देण्यासाठी लोकलने कर्नालला निघालो होतो. मी गाडीत चढलो तेव्हा तिथल्या काही प्रवाशांनी माझ्या दिसण्यावरून काही शेरेबाजी केली. माझा त्यांच्याशी वाद झाला आणि भांडण विकोपाला गेलं. त्यांनी मला चालत्या गाडीतून खाली ढकलून दिलं. तेव्हा गाडीचा वेग कमी झाला होता आणि मी प्लॅटफॉर्मवर उडी मारू शकलो. पण माझी परीक्षा बुडाली आणि पुढे शिकण्याची संधीसुद्धा. मला फार काही इजा झाली नाही पण पुन्हा काही त्या मार्गाने प्रवास करण्याची माझी हिंमत झाली नाही.

आपण साठवलेल्या पैशातून कबीरने आता सायकल घेतली आहे. मेट्रोने प्रवास करताना ट्रान्स व्यक्तींना रोजच हिंसक वागण्याचा जाच सहन करावा लागतो तो तरी आता टळतो. फोटोः वंदना बन्सल

मी हल्ली दिल्ली मेट्रोने जाणंसुद्धा बंद केलं आहे. प्रवेश करताना सुरक्षा तपासणीसाठी महिलांसाठीच्या रांगेत गेलो तर ते मला प्रवेश नाकारतात. आणि पुरुषांच्या रांगेत गेलो तर चक्क सांगतात, “आप यहाँ से नही जा सकते.”

असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा मला जीव द्यावा असं वाटलं होतं – आणि मी एकदा तसा प्रयत्न केला देखील. पण दुसऱ्याच क्षणी मला त्याचा पश्चात्ताप झाला. तेव्हा मी २७ वर्षांचा होतो. लैंगिक साक्षरतेसाठी काम करणाऱ्या एका संस्थेशी मी संपर्क साधला. तिथे मी स्वतः नक्की कोण आहे याबद्दल खुलेपणाने बोलू शकलो आणि तिथपासून एक ट्रान्स पुरुष म्हणून माझी स्वतःची ओळख जास्त स्पष्ट होत गेली. स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते त्यांनी मला शिकवलं. [या गोष्टीच्या शेवटी आत्महत्या प्रतिबंधक मदत सेवांचे तपशील दिले आहेत. जरूर पहा.]

रोजच्या या सगळ्या त्रासाला, जाचाला कंटाळून साधारण एक वर्षापूर्वी मी दिल्लीच्या पश्चिमेकडच्या द्वारकामध्ये एका दवाखान्यात संप्रेरक उपचार घ्यायला सुरुवात केली. मेट्रोने प्रवास करताना आणि सार्वजनिक ठिकाणी मी बाई का पुरुष हा गोंधळ होतो तो तरी टळेल असा मी विचार केला.

गेल्या वर्षी मी संप्रेरक उपचार पद्धती सुरू केली आणि आता आयुष्यभर मला औषधं घ्यावी लागणार आहेत. त्याचे शरीरावर इतरही काही परिणाम होतील. मला दर तीन महिन्यांनी दवाखान्यात जाऊन टेस्टोस्टेरॉन अनडेकॅनोएट या संप्रेरकाचं इंजेक्शन घ्यावं लागणार आहे. एका इंजेक्शनला ३६० रुपये खर्च येतो. पण इतर औषधं, रक्ताच्या तपासण्या आणि पोटाची सोनोग्राफी असा सगळा खर्च धरून दर वेळी ४,००० रुपये उपचारांवर जाणार आहेत. या उपचारांमुळे इतरही काही विपरित परिणाम होतात असं म्हणतात. मूडमध्ये चढउतार, चिंता, रक्तातल्या साखरेचं असंतुलित प्रमाण आणि यकृत आणि मूत्रपिंडांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो.

मी पुढच्या वर्षी [२०२२] लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेणार आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे केवळ माझ्या व्यक्तिमत्वात बदल होईल किंवा माझ्या आधार कार्डावर मी आता लिंग पुरुष लिहू शकेन इतकंच नाहीये. मला माझं खरं आयुष्य, एक ट्रान्स पुरुष म्हणून माझं आयुष्य जगायचंय. मला यासाठी ७-१० लाख रुपये खर्च येणार आहे. यामध्ये तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया करतात – स्तन काढून टाकले जातात. लिंग तयार केलं जातं आणि संप्रेरक उपचार पद्धती. यातल्या पहिल्या शस्त्रक्रियेसाठी मी सध्या पैसे साठवतोय.

पाठीशी उभं राहिलेलं घरः कबीर, त्याचा भाऊ मुकुल, वय २६ (सगळ्यात डावीकडे), आई सरला आणि बहीण नम्रता, वय २४ (सगळ्यात उजवीकडे). फोटोः वंदना बन्सल

खाजगी दवाखान्यात खर्च खूप येणार आहे पण मी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचारही करू शकत नाही. तिथले लोक तुमच्याबद्दल ग्रह करून घेतात आणि माझी स्थिती त्यांना एक ‘समस्या’ वाटते. एकदा मी एका सरकारी डॉक्टरला माझी स्थिती सांगितली होती. तेव्हा त्यांनी मला विचारलं, “तुला बॉयफ्रेंड आहे का? तू कधी सेक्स केलंयस का? करून पहा. कदाचित फायदा होईल.”

मला माझ्या घरच्यांचं पाठबळ आहे ही फार मोलाची गोष्ट आहे. माझ्या आईला अर्थातच या सगळ्याचं खूप टेन्शन आलंय. तिला वाटतं की मी माझं मुलीचं शरीर आहे तसं राहू द्यावं आणि पुरुषांचे कपडे तेवढे घालावेत. माझा धाकटा भाऊ जाहिरातक्षेत्रात काम करतो आणि माझी बहीण स्पर्धा परीक्षांची तयारी करतीये. त्या दोघांचा माझ्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे.

सध्या मी एका लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनीच्या गोदामात रोज १० तास काम करतोय. महा महिन्याला सुमारे २०,००० रुपये पगार मिळतो. माझं स्वप्न आहे की एक दिवस असा एक कॅफे सुरू करावा जिथे सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं जाईल. रोजच्या घाईगर्दीच्या, कलकलाटी आयुष्यात चार निवांत क्षण आणि मनाला शांती देणारी जागा लोकांना उपलब्ध करून द्यावी अशी माझी फार इच्छा आहे. मला मात्र शोधूनही ती कधीच मिळाली नाही.

जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुमच्या ओळखीचं कुणी तणावाखाली असेल तर किरण या राष्ट्रीय हेल्पलाइनशी संपर्क साधा – १८००-५९९-००१९ (२४ तास, टोल फ्री) किंवा तुमच्या जवळच्या यापैकी कोणत्याही हेल्पलाइनशी संपर्क साधा. मानसिक आरोग्यासाठी सेवा आणि सेवादात्यांची माहिती हवी असल्यास, एसपीआयएफ ने तयार केलेल्या या सूचीची अवश्य मदत घ्या.

अनुवादः मेधा काळे

Editor's note

वंदना बन्सल नवी दिल्ली येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेमध्ये पत्रकारिता व जनसंवाद पदवीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. पारी एज्युकेशनसाठी इंटर्न म्हणून काम करत असताना तिने ही कहाणी लिहिली. “ट्रान्स पुरुषांबद्दल आपल्याला फारसं कुठे काही ऐकायला मिळत नाही. कारण पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये त्यांना स्थानच दिलेलं नाही. कबीर मानशी बोलल्यानंतर, त्याच्याविषयी जाणून घेतल्यानंतर मला जात आणि लिंगभाव तसंच आपल्या समाजात फार खोलवर रुजलेला ट्रान्स व्यक्तींबद्दलचा तिरस्कार हे वास्तव जाणून घेता आलं.”

पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवादक आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.