माया मोहिते तीन महिन्यांच्या शीतलची देखभाल करत आहे. बाळाची आई, पूजा, त्यांच्या खोपीपासून काही अंतरावर कामावर गेलीये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातले कापड आणि ताडपत्रीच्या दोन खोपी हीच त्यांची घरं. माया एका खडकावर बसून, उद्यानातल्या एका झऱ्याच्या पाण्यात भांडी घासतीये . बाळ पाळण्यात झोपी गेलंय – पाळणा म्हणजे लाल पांघरूण घाललेलं एक जुनं सिमेंटचं पोतं.

“इथे एका कार पार्किंगचं बांधकाम सुरु आहे,” माया सांगते. मुंबईतल्या बोरिवली (पूर्व) मधल्या राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशापाशी पार्किंगचं बांधकाम सुरू आहे. डिसेंबर २०१८ मध्ये माया आपल्या कुटुंबातील सात जणांसोबत इथे आली, त्यातलीच एक म्हणजे पूजा, तिची नणंद. कुटुंबातले काही जण मुंबईहून सुमारे ७० किमी दूर खोपोलीतल्या एका बांधकामाच्या साइटवरून इथे आले, आणि काही जण राजस्थानातलं काम उरकून बोरिवलीत पोचलेत.

दरवर्षी पावसाळ्यात मोहिते कुटुंबीय आपल्या गावी, जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हर्पाळ्याला परततात. हे कुटुंब बेलदार जमातीचं आहे. (काही राज्यांमध्ये यांची नोंद भटक्या जमातीत होते). मायाचे पालक आणि त्यांची तीन भावंडंसुद्धा शेतमजूर आहेत. “माझं लग्न झालं तेव्हा मी फार लहान होते. तेव्हा मी शेतात कामं करायची,” आता २५ वर्षांची असणारी माया सांगते.

गेली बरीच वर्षं मायाच्या सासू-सासऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इतर भागात बांधकामावर काम केलं. “मग त्यांनी गावात एक एकर जमीन घेतली अन् ते परत आले,” मुकेश मोहिते, मायाचा दीर सांगतो. काही वर्षं त्यांनी शेतमजुरी करून पाहिली; पण मजुरी रु. १५०-२०० च्या वर वाढेचना. मग त्यांनी परत बांधकामावर कामं करायचं ठरवलं, जिथे रोजगार रु. ४००-५०० पर्यंत मिळू शकतो, मुकेश सांगतो. 

कंत्राटदारांकडून काम मिळेल तसं मोहिते कुटुंबाला निरनिराळ्या राज्यांत फिरावं लागतं. “आम्ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली सगळीकडे काम केलंय. मुकादम आम्हाला सांगतो, ‘इकडे या, तिकडे जा’,” माया म्हणते. पावसाळ्यात मोहिते कुटुंबीय हर्पाळ्याच्या नजीक शेतात किंवा बांधकामावर मजुरी करतात. 

“आम्ही [कंत्राटदाराकडून] रु. २०,००० उचल घेतलीये,” माया सांगते. यातले काही पैसे खोप उभी करण्यात खर्च झाले. मुंबईतील राष्ट्रीय उद्यानात आपला मुक्काम हलवलेल्या या १० जणांच्या कुटुंबाला कंत्राटदाराकडून आठवडाभर खर्चायला रु.५,०००- १०,००० मिळतात. हे त्या आठवड्यात काय लागणार आहे त्यावर आणि वाटाघाटींवर अवलंबून असतं. “दर रविवारी मी राशन विकत घ्यायला जाते; बाकी [आठवड्याची कमाई] माझ्या सासूला देते,” माया सांगते. काम संपल्यावर शेवटी मिळणाऱ्या पैशातून ही आठवड्यांची रक्कम वजा करण्यात येईल. 

कुटुंबातील प्रत्येक जण सकाळी ७:०० वाजता काम करायला उठतो आणि सगळे संध्याकाळी ६:३०-७:०० पर्यंत काम संपवतो. दहा जणांच्या या कुटुंबात माया आणि आणखी दोन महिलांना (पूजा आणि लक्ष्मी, त्यांच्यासोबत राहणारी एक नातेवाईक) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील शौचालय वापरण्याची मुभा आहे. इतर ठिकाणी, माया म्हणतात, “दूर-दूर पर्यंत काही नसतं, अन् आम्हाला ताटकळत राहावं लागतं.”

कामाचे तास कंत्राटदाराने दिलेल्या कामावर अवलंबून असतात. रविवार सुट्टीचा. तुलसीदास भाटिया, या प्रकल्पाचे मुख्य कंत्राटदार, म्हणतात, “यातले सगळे कामगार वेगवेगळ्या गटातले आहेत. काहींना दिवसाला रु. २०० तर काहींना रु. २००० मिळतात.” दिवसाला रु.२,००० कोणाला मिळतात हे त्यांना विचारलं असता ते उत्तर देतात- जे “कष्टाळू आहेत.” भाटिया यांच्यासाठी काम करणारे छोटे कंत्राटदार  निरनिराळ्या राज्यांतून बांधकामावर मजूर घेऊन येतात – जसं की मोहिते कुटुंबीय. 

राष्ट्रीय उद्यानातला मुक्काम आणि कामः पूजा (डावीकडे वर); लक्ष्मी (उजवीकडे वर); मुकेश (डावीकडे खाली); मुकेश, माया, पूजा, त्यांची मुलगी शीतल, आणि मायाचा मुलगा अविनाश (उजवीकडे खाली)

हर्पाळ्यातील त्यांचे सासरे सोडले तर त्यांच्या कुटुंबातील इतर कोणाकडेच बँक खातं नाही, माया सांगते. खर्च झाल्यावर उरलेली सगळी मिळकत ते त्यांना पाठवून देतात, “आम्ही बँकेत पैसे ठेवत नाही, कारण बँकेत ठेवण्यापुरते पैसे तरी पाहिजेत ना!” मुकेश म्हणतो. त्याला त्याचा थोरला भाऊ राजेश आठवड्याला रु. २०० देतो. कशासाठी विचारल्यावर मुकेश ओशाळून म्हणतो, “कधीमधी तंबाखूला आणि उरलेच तर फोन रिचार्ज करायला.”

बाळ आता रडायला लागलंय, त्याला भूक लागलीय. माया तिला पूजाजवळ घेऊन जाते, जी पार्किंगच्या जवळील भिंतींना गिलावा करतीये. “तिचा पप्पा अन् बाकी घरच्यांनी तिला पाहिलं पण नव्हतं कारण ते कामावर होते. सगळे तिला पाहण्यासाठी आतुर होते. ती इकडे आली तेव्हा जेमतेम महिनाभराची असेल,” पूजा सांगते. दोन वर्षांपूर्वी, (तिच्या अंदाजाने) १६ व्या वर्षी तिचं राजेश मोहितेसोबत लग्न झालं, आणि तेव्हापासून तीदेखील बांधकामावर काम करू लागली. 

एक चिमुकला हातात फोन घेऊन तंबूजवळ येतो. हाच मायाचा पाच वर्षांचा मुलगा, अविनाश. तिच्या दोन मुली, पूनम, ९, आणि वैशाली, ७, सासू-सासऱ्यांजवळ गावी राहतात. माया म्हणते तिला आणखी मुलं नको आहेत: “पाच वर्षांपूर्वी, म्हणजे याचा जन्म झाल्यानंतर मी माझं ऑपरेशन करून घेतलं.”  तिचा पती, उरज वर्षभरापूर्वी दुसऱ्या बाईबरोबर राहण्यासाठी, तिला सोडून गेला असं तिला वाटतंय. तिला आपल्या मुलींना किमान इयत्ता १२वी पर्यंत शिकवायचंय, आणि नंतर त्यांचं लग्न लावून द्यायचंय. पण, आपल्या मुलाला मात्र तिला पुढे शिकवायचंय आणि तिला वाटतं त्याने आपल्या काकांसारखं काम करू नये.

घरासाठी भाज्या आणि किराणा आणायला माया सहसा बोरीवलीच्या बाजारात जाते. पण, लवकरच घरात एक कार्य होणार आहे, आणि एरवीपेक्षा जास्त सामान भरावं लागणार आहे. मुकेश यांचं लग्न होऊ घातलंय. “मी खूश आहे,” माया म्हणते. “[अशा प्रसंगी] सगळे एकत्र गातात, मौजमजा करतात.”

डावीकडे : माया आणि पूजा आठवड्याचं राशन आणि भाजीपाला आणायला बोरिवलीच्या बाजारात जातात . उजवीकडे : पूजाने नुकतीच शीतलसाठी तिच्या निळ्या फ्रॉकला साजेशी एक निळी क्लिप आणलीये

मुंबईत तीन महिने काम करून अखेरीस सगळे खर्च वजा जाता माया आणि तिच्या कुटुंबाच्या हाती रु. ४०,००० आलेत. आगाऊ रक्कम आणि आठवड्याची कमाई जोडली, तर आठ वयस्क कामगारांना ९० दिवसांच्या कामाचे रु. १,६०,००० मिळाले – अर्थात दिवसाला प्रत्येकी रु. २२५.

मार्चच्या अखेरीस, राष्ट्रीय उद्यानातील बांधकामाच्या ठिकाणी काम संपवून मोहिते कुटुंबातील काही सदस्य गावी परतले, आणि लग्नाअगोदर अजून थोडी कमाई करण्यासाठी खोपोलीला गेले.

लग्न झाल्या झाल्या सगळ्यांनी नवीन सदस्याबरोबर – मुकेशची पत्नी रुपाली – मिळून पुन्हा कामावर जायचं ठरवलंय. तिने त्यांच्यासोबत काम केलं नाही तर, मुकेश म्हणतात, “ती खाईल काय?” आणि आता पाऊस पडला की, ते शेतांत काम करायला हर्पाळ्याला परत जातील.

अनुवादः कौशल काळू 

कौशल काळू रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.