७२ वर्षांच्या अनुसुयाबाई हरिश्चंद्रगडाच्या खडकाळ वाटेने वर निघाल्या आहेत. पायात फक्त रबरी स्लिपर. गेली दहा वर्षं त्या सह्याद्रीच्या पश्चिम घाटातला ४,७१० फूट उंचीवरच्या या गडावर ये-जा करतायत. २०१२ साली त्यांच्या घरच्यांनी गडावर एक खानावळ सुरू करायचं ठरवलं आणि अर्थातच वरती जायचं तर गड चढून जाणं एवढाच मार्ग. ६०-८० अंश चढण असलेली खडकाळ वाट चढून जायला तीन तास लागतात आणि उतरायलाही तितकेच.

काही काळाने अनुसुयाबाईंच्या कुटुंबाने खालच्या पठारी भागात राहण्याची सोयसुद्धा सुरू केली. पर्यटकांची वाढती संख्या पाहता त्यातनं चार पैसे कमवण्याचा साधा सरळ विचार त्यांनी केला. आज वरच्या हॉटेलमध्ये आणि खाली निवासामध्ये अगदी उत्तम चवीचं जेवण देणाऱ्या आणि सरसर गड चढणाऱ्या अशी अनुसुयाबाईंची ओळख निर्माण झाली आहे.

“लोक मला विचारतात, बूट हवेत का म्हणून. पण मला या स्लिपरच बऱ्या वाटतात,” अनुसुयाबाई सांगतात. गडावरच्या खानावळीला लागणारं सामान सुमान नेण्यासाठी त्या एरवी कुणाला तरी सोबत घेऊन जातात. गडावरती जेवण मिळणारी एवढी एकच जागा असल्याने गड चढणाऱ्यांसाठी ही अगदी आवडीची ठरली आहे.

चिखलमातीच्या आणि कुडाच्या भिंती असलेली ही खानावळ जोराचा पाऊस येऊन गेला की दुरुस्त करावी लागते. “कोणता पाऊस नुकसान करणार ते आम्हाला बरोबर समजतं. आम्ही गडावरचं हॉटेल त्याच्या आधीच बंद करतो. कुणाला उगाच धोका नको,” अनुसुयाबाई म्हणतात. परत सगळं बांधायचं म्हणजे दोन आठवडे जातात.

हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी – अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या पाचनईत – पर्यटकांसाठी राहण्याची सोयही या कुटुंबाने केली आहे. एका बाजूला किल्ला आणि दुसऱ्या बाजूला जंगल.

हरिश्चंद्रगडाचा इतिहास पार सहाव्या शतकापर्यंत मागे जातो आणि पर्यटकांचं हे अत्यंत आवडीचं ठिकाण आहे. “जुलै ते डिसेंबर या काळात दर शनिवारी-रविवारी किमान १००-१५० पर्यटक आमच्या इथे जेवतात. इथे साहसी खेळ असतात त्याच्यासाठी लोक येतात आणि धबधबे सुरू असतात ना,” शनिवार-रविवारी अनुसुयाबाई गड चढून जातात कारण वरती हॉटेलमध्ये कामं असतात. “गडावर जायचं तर फक्त मार्चपर्यंतच. त्यानंतर इथे कुणीसुद्धा फिरकत नाही,” त्या सांगतात. 

गावातली बहुतेक घरं गवताने शाकारलेली, शेणाने सारवलेल्या विटांच्या भिंतींची आहेत. बदड कुटुंबांच्या घरात स्वयंपाकघरात आणि मोरीत केवळ एक बल्ब आहे. मोरीला देखील मातीच्या भिंती आहेत. घराला लागूनच एक सिमेंटचं बांधकाम असणारी खोली आहे. इथे पर्यटक जेवायला बसतात, रात्री मुक्काम करतात. १५० रुपयांत जेवण मिळतं. भाजी, भात, वरण, लोणचं आणि हव्या तितक्या चपात्या. खर्च वजा केल्यावर आठवड्याला ५०००-८००० रुपये हातात येतात. 

ऑगस्ट महिना आहे. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या घराच्या अंगणात मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पर्यटकांचा एक हौशी गट दाखल होतो. अनुसुयाबाईंचा थोरला मुलगा भास्करदादा बदड पळत पळत घरी जातो आणि आलेल्यांचं स्वागत करतो. अंधारात आलेल्या पर्यटकांना वाट दाखवतो. गाडी कुठे लावायची, घराच्या बाहेर चपला-बूट कुठे काढून ठेवायचे ते सांगतो. त्यानंतर अनुसुयाबाईंची सून आशा त्यांच्या, म्हणजे ‘आईं’च्या मदतीने जमिनीवर चटई अंथरते, पाण्याची एक कळशी नेऊन ठेवते तसंच गरम गरम चहा देते. आलेले गिर्यारोहक येऊन बसतात आणि अनुसुयाबाईंचे पती नाथू बदड त्यांच्याशी गप्पा मारू लागतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. तेवढ्या वेळात भास्करदादा नाश्ता आणून देतो, शक्यतो पोहे दिले जातात. “२०११-१२ पासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे,” भास्करदादा सांगतो.

शनिवार आणि रविवार दोन्ही हॉटेलची व्यवस्था बघण्यात जातात. ते सोडता अनुसुयाबाई आणि त्यांचं कुटुंब २.५ एकरात भाताची शेती करतं. “पूर्वी फक्त ४-५ पोती भात व्हायचा. आज हायब्रीड बियाणं आहे, जास्त कष्ट घेतले तर रानात २०-३० पोती भात होतो. पर्यटकांसाठी घरचाच तांदूळ वापरतो आम्ही,” ४० वर्षीय भास्करदादा सांगतो. उरलेला घरी खायला होतो.

शनिवारी-रविवारी येणाऱ्या पर्यटकांसाठी लागणारं सामान आणायला अनुसुयाबाई भास्करदादा सोबत सोमवारी आणि गुरुवारी राजूरला जातात. पाचनईपासून सगळ्यात जवळचं शहर म्हणजे राजूर. रस्ता खड्ड्याने भरलेला. “जास्तीत जास्त २५ किलोमीटरचा रस्ता असेल पण मोटरसायकलवर जायला दीड तास लागतो,” भास्करदादा सांगतो.

पाचनईमध्ये १५५ घरं असून गावाची लोकसंख्या ७०० इतकी आहे. पण गावकरी सांगतात की इथे कुठल्याही नागरी सुविधा मिळत नाहीत. रेशनसुद्धा येत नाही. “आमच्या गावाला रेशन मिळायचं फार पूर्वीच बंद झालंय,” अनुसुयाबाई सांगतात. म्हणून लोक आता स्वतःच उपाय शोधत आहेत. गावातल्या विहिरीचं पाणी पिण्यालायक नाही असं कळल्यावर “आम्ही गडावर येणाऱ्या लोकांकडून एक-दोन रुपये पट्टी काढली आणि त्या पैशातून जवळच्या धबधब्याच्या पायथ्याला मोटर बसवून पाइपलाईन करून घेतली,” नाथू सांगतात. अलिकडेच वनखात्याने शौचालयं बांधली आहेत.

अनुसुयाबाईंचा जन्म शेजारच्या कोथळे गावातला. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचं नाथू यांच्याशी लग्न झालं आणि त्या पाचनईला सासरी नांदायला आल्या. दहा वर्षं उलटल्यानंतर कामाच्या, चांगल्या संधींच्या शोधात कुटुंबातले सदस्य शहरी जाऊ लागले आणि कुटुंब विभागलं गेलं. “आई शेतात काम करायच्या आणि नारायणगावला रोजंदारीवर शेतात मजुरी करायला जायच्या. १२ तास काम केल्यावर ४०-५० रुपये हातात पडायचे,” भास्करदादा सांगतो. हॉटेल सुरू करण्याआधी कशी परिस्थिती होती ते तो सांगतो.

हरिश्चंद्र गड हा गिर्यारोहणासाठी खडतर मानला जातो. चढण आणि मोठमोठे कातळ असलेल्या गडाच्या वाटेवर पायऱ्या बांधलेल्या नाहीत. धबधब्याच्या खालचा भाग निसरडा असतो आणि म्हणूनच धोकादायक देखील. वाटेत काही ठिकाणी पाठपिशव्या काढून रांगत जावं लागतं. पण अनुसुयाबाई मात्र डोक्यावर सामानाची पिशवी घेऊन ताठ चालत गड सर करू शकतात.

या वर्षाच्या सुरुवातीला अनुसुयाबाई गडावरच्या कोकणकड्यावरून (१,८०० फूट) रॅपलिंग करत ५०० फूट खोल दरीत उतरल्या. त्या सांगतात, “मला फार वर्षांपासून या कड्यावरून खाली उतरत यायची इच्छा होती. पण म्हाताऱ्या बाईचं कोण ऐकतंय?”

या कहाणीच्या वार्तांकनासाठी सहाय्य केल्याबद्दल सर्व विद्यार्थी गणेश गीध आणि भास्कर बदड यांचे मनापासून आभारी आहेत.

पारीवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

Editor's note

ऋतुजा गायधनी सेंट झेवियर्स कॉलेज (स्वायत्त), मुंबई येथे जनसंवाद आणि पत्रकारितेची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. शुभम रसाळ याने सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे इथून २०२१ साली पदवी घेतली आहे. हे दोघं म्हणतात, “आम्हाला माहित असलेल्या जगाची आम्ही खरं तर फारशी दखल घेत नाही हे या वार्तांकनादरम्यान आम्हाला कळून चुकलं. गावकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या समस्यांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आम्हाला दिली.”

अनुवादः मेधा काळे

पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवाद आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.