
पहाट झालीये. ४.३० वाजलेत. पक्ष्यांचा किलबिलाट अजून सुरू झाला नसला तरी वाहत्या पाण्याचा आवाज कानावर यायला लागलाय. स्टीलच्या आणि प्लास्टिकच्या बादल्यांचा आवाज कानावर पडला की ओळखायचं असियाकी गोरावासच्या बायांचं पाणी भरण्याचं काम सुरू झालंय.
सुमित्रा (ती फक्त एवढंच नाव लावते) मुख्य रस्त्यावरच्या सार्वजनिक नळावर छोट्या डब्याने रांगेत मांडलेल्या स्टील आणि प्लास्टिकच्या बादल्या किंवा माठामध्येही पाणी भरतीये.
या सार्वजनिक नळावर रोज पाणी येतं पण त्याच्या वेळा मात्र निश्चित नाहीत. तुमचं नशीब, तुमची अटकळ आणि शेजाऱ्यांची मदत असं सगळं जुळून आलं तर रेवारी जिल्ह्यातल्या जतुसाना तालुक्यातल्या आमच्या या गावात घरच्यासाठी पाणी भरून होतं. कारण पाणी जायच्या आत तुम्ही तिथे पोचायला पाहिजे. सुमित्रा हातातली सगळी कामं करत करत पाण्यासाठी दिवसातल्या कुठल्याही वेळी तुम्हाला इथे भेटेल, कधी रात्री ११ वाजता, कधी मध्यरात्री २ वाजता तर कधी पहाटे ४ वाजता. पाणी सुटलं की आपण हजर व्हायचं, इतकंच तिला माहितीये.
आजवर एकदाही तिने पाण्याचा दिवस चुकवलेला नाहीये आणि त्यासाठी ती दुसऱ्या कुणाच्याच भरोशावर राहत नाही. खरं सांगायचं तर अर्थार्जन किंवा घरच्यांसाठी स्वयंपाक-पाणी अशा कुठल्याच गोष्टीसाठी माझी आई दुसऱ्या कुणावरच अवलंबून राहत नाही.
“कहाँ से दिन शुरु और कहाँ खत्म, हमें कोई अंदाजा नही,” ती म्हणते. दिवसभर आणि खरं तर रात्रीचाही बराचसा वेळ ती फक्त कामाचा ढिगारा उपसत असते. आईचं वय ५५ वर्षं आहे आणि आम्ही चार भावंडं आहोत – माझा थोरला भाऊ, हरिराम, वय २९, माझ्या बहिणी मंजू कुमारी आणि रितू, वय अनुक्रमे २६ आणि २३. मी सगळ्यांमध्ये धाकटा आहे.
एकदा का पाणी भरून झालं की ती सहा जणांच्या आमच्या कुटुंबासाठी सकाळचा स्वयंपाक बनवायला बसते. चुलीवर चपात्या आणि रस्सा भाजी करुन झाली की कामाला निघण्याआधी ती घरची बाकी सगळी कामं उरकते.
माझ्या आईसारख्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना कसलीच हयगय करून चालत नाही. नाही तर त्या दिवसाचं काम गेलंच म्हणून समजा. अगदी स्वतःसाठी केलेला चहासुद्धा ती एक मोठा घोट घेऊन घटकन पिऊन टाकते. सोबत काम करणाऱ्या शेजारणींना मोठ्याने आवाज देते आणि घर सोडते. घरचे बाकी सगळे तेव्हा निवांत झोपलेले असतात.
शेजारच्या शांता देवी सकाळचा स्वयंपाक करतायत. पण माझ्या आईचा आवाज कानावर पडताच त्या हात धुऊन लगेच निघतात. बाकी सगळं आपल्या लेकीला उरकायला सांगतात. या दोघी आणि इतर रोजंदार मजुरांना शेतात घेऊन जाण्यासाठी जमीनदाराने ट्रॅक्टर पाठवलाय, तिकडे त्या झपाझप पावलं टाकत निघतात. शेतात काम करताना कुडत्याच्या वरून घालायचा शर्ट दाराजवळच्या खुंटीला अडकवलाय. तो घेतात आणि डोक्याला दुपट्टा गुंडाळून ४५ वर्षीय शांता मावशी घर सोडतात.
आज परत उशीर झालाय त्यामुळे त्यांचं जरा बिनसंलय. दिवसभर उपसायचे कष्ट दिसत असतात आणि त्या आपल्या नशिबाला बोल लावायला सुरुवात करतात. “भागें जावें, भागें आवें, ना खाने को टाइम, ना पीने का टाइम,” आपल्याशीच बोलत बोलत इतर बायकांबरोबर त्या ट्रॅक्टरवर चढून बसतात.
माझी आई आणि शांतामावशीबरोबर सुन्नो, राजन देवी, आरती आणि लीलाबती पण मजुरीला निघाल्या आहेत. या सगळ्या आमच्या असियाकी गोरावास गावच्या रहिवासी आहेत आणि रोजंदारीवर कामं करतात. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी बड्या शेतकऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या या शेतमजूर बाया आहेत. कामावर जाण्यासाठी कधी कधी येऊन जाऊन त्या १०० किलोमीटर प्रवास करतात आणि हे देखील दररोज, न चुकता.
माझं गाव, असियाकी गोरावास, दिल्लीच्या दक्षिणेला २०० किलोमीटरवर रेवारी जिल्ह्यात आहे. आमच्या गावाची लोकसंख्या २,८६२ आहे आणि यातले १,०४९ दलित आहेत, माझ्या आईसारखे, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही.
माझे वडील लिखी राम, वय ६३ फेरीवाला म्हणून काम करायचे – डबा-बाटली, तांबं, लोखंड असं विकाऊ काहीही भंगार ते गोळा करायचे. जतुसना तालुक्यात सायकलवर हे सगळं गोळा करत हिंडायचे आणि नंतर भंगारवाल्याच्या दुकानात जाऊन विकायचे.
दोन वर्षांपूर्वी ते शिडीवरून खाली पडले आणि त्यांच्या गुडघ्याला इजा झाली. तेव्हापासून ते घरीच असतात. आईला फार वाटतं की त्यांनी किमान दुकानात वगैरे बैठं काम शोधावं. तेवढेच चार पैसे मिळतील.
आईचं नशीब जोरावर असेल तर तिला महिनाभरात २० दिवस काम मिळतं. कधी कधी मात्र तर दोन दिवससुद्धा काम मिळत नाही. मग अशा वेळी ती घरकाम उरकते, पण मनात एकच इच्छा असते, काही तरी मजुरीचं काम मिळावं.
तिच्यासारख्या बायांना महिन्याला सरासरी ५,००० ते ६,००० रुपये मिळतात. “खाणं-पिणं, वीजविब, कॉलेजच्या फिया, पुस्तकं आणि इतर आला-गेला असा सगळा घरखर्च गेला तर हातात दमडी पण राहत नाही. त्यामुळे स्वतःसाठी एखादी ओढणी घ्यावी किंवा बांगड्या घ्याव्या म्हटलं तरी हातात पैसे नसतात,” हे तिचं उत्तर. तुझ्यासाठी तू काही घेत का नाहीस या प्रश्नावरचं.
आई अगदी १३ वर्षांची असल्यापासून अशी फुटकळ मजुरीवर काम करतीये. वयाच्या १५ व्या वर्षी तिचं लग्न झालं. तेव्हा एक दोन महिने खंड पडला तेवढाच. आपल्या चारही गरोदरपणात आणि त्यानंतर माझ्या थोरल्या भावाला, हरिरामला सोबत घेऊन ती शेतात मजुरीला जातीये.
खुल्या आभाळाखाली शेतातलं काम म्हणजे उन्हाळ्यात उन्हाची काहिली आणि हिवाळ्यात सकाळचा थंडीचा कडाका. वर्षभर शेतीचं चक्र कसं चालतं ते तिच्या चांगलंच अंगवळणी पडलंय. ती म्हणते की एप्रिलमध्ये उन्हाच्या कारात गव्हाची कापणी जितकी कठीण असते ना त्यापेक्षा मे आणि जून महिन्यातली कसानीची (चिकोरी) काढणी आणखी घाम काढते. कारण या काळात हरयाणामध्ये पारा ४५ अंश सेल्सियसच्या वर जातो.
जुलै महिन्यात जेव्हा भाताची लावणी सुरू असते तेव्हा ती सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अथक काम करते. जेवणाची सुटी फक्त एक तासाची असते. ११ तास एक फूट खोल पाण्यात ती पाय घट्ट रोवून काम करत असते. पूर्ण वेळ ओणवी. तिच्या शब्दांत या कामाचं वर्णन ऐकायचंय? “भाताच्या खाचरात किमान दोन फूट पाणी असतं, सगळा चिखल. त्यामुळे जमीन बिलकुल दिसत नाही. वर सूर्य अशी आग ओकत असतो की कधी कधी वाटतं या खालच्या पाण्याला उकळीच फुटेल.”
एकरभर शेतात लावणीसाठी आठ ते दहा मजूर लागतात आणि शेतमालक त्यांच्या टोळीला मिळून ३,५०० रुपये देतो. म्हणजे प्रत्येकीच्या वाट्याला ३५०-४०० रुपये येतात. आई सांगते की गेल्या २० वर्षांत काम लक्षणीय रित्या घटलंय. “एक तर, हार्वेस्टर यंत्रं आली आणि अलिकडच्या काळात बिहारहून मजूर यायला लागलेत. ते कमी पैशात काम करायला तयार असतात.”

रेवारीमध्ये ऑक्टोबर महिना धामधुमीचा असतो. कारण याच महिन्यात कपास, बाजरी आणि भात कापणीला येतो. त्यानंतरच्या काही महिन्यात – डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी – इतर शेतमजुर बायांबरोबर आईसुद्धा रानातून बथुआची (चंदनबटवा) भाजी गोळा करून आणते. गहू आणि मोहरीच्या रानात तण असल्यासारखी ही भाजी उगवते. शेतमालकसुद्धा बायांना याचे पैशे मागत नाहीत. भाजी विकून येणारा पैसा बायांनाच मिळतो. ३-५ रुपये किलो अशी भाजी विकली जाते आणि दिवसाला अगदी ३० किलोपर्यंत विक्री होते. वर्षातल्या या तीन महिन्यांत हातात जरा जास्त पैसा खेळतो त्यामुळे अगदीच ओढगस्तीचे महिनेसुद्धा तारून नेता येतात.
अजून तर जुलै महिनाच सुरू आहे आणि लावणीची कामं चालू आहेत. दुपार झाली किंवा जरा उशीराने सगळ्या बाया एखाद्या झाडाखाली जेवायला बसतात. ही एक तासाची काय ती त्यांची सुटी. जेवणाचे स्टीलचे डबे बाहेर येतात. सकाळी लवकर उठून केलेली भाजी आणि चपात्या सगळ्या वाटून खातात. आणि ज्यांच्या घरी सकाळी चूल पेटली नसेल त्यांनाही जास्तीचं काही असलं तर देऊन टाकतात.
जेवण जर लवकर उरकलं तर त्या ओढणीची उशी करून जरा आडव्या होतात. दुखरे पाय आणि पाठ जरा ताणून घेतात. इकडच्या तिकडच्या गप्पा निघतात. मी त्यांच्या बरोबर गेलो तेव्हा आदल्या दिवशी झालेला जोरदार पाऊस हाच सर्वांच्या बोलण्याचा विषय होता. घराला पडलेल्या भेगांबद्दल बोलताना लीलाबती म्हणतात, “घराच्या बाहेर आणि घराच्या आत, सारखाच पाऊस होता,” म्हटलं तर खरं म्हटलं तर अतिशयोक्ती असं त्यांचं हे वर्णन होतं.
५५ वर्षांच्या लीलाबतीसुद्धा वयाच्या १३ व्या वर्षापासून शेतातली कामं करतायत. आणि सध्या तर त्यांच्या चौघांच्या कुटुंबातल्या त्या एकुलत्या एक कमावत्या सदस्य आहेत. “माझा नवरा नुसता घरी बसून आहे आणि मुलगा देखील काहीही करत नाही. दररोज डोक्याचा ताप तेवढा वाढवतो,” लीलाबती सांगतात. त्या सांगतात त्यात काहीही वावगं नाही. या भागातले कित्येक तरुण शिकतही नाहीत आणि कामालाही जात नाहीत. “आम्ही गरीब लोक आहोत. हातावर पोट आहे. काम केलं तर दोन घास मिळतील. नाही तर उपासच आहे,” त्या म्हणतात. तुम्ही कामाला का जाता असं विचारल्यावर त्यांनी दिलेलं हे उत्तर.
आमच्या शेजारी, सुन्नो त्यांना दुजोरा देत म्हणतात, “मी घराबाहेर पडून चार पैसे कमावले नाहीत तर खाऊ काय?” त्यांच्या घरातही नित्याने काम करणाऱ्या त्या एकट्याच आहेत. त्यांचे पती बलबीर सिंग अधून मधून घर राखणीची वगैरे कामं करतात. पण त्यांची दोन्ही मुलं, वय वर्षं ३० आणि २६ कामही करत नाहीत आणि शिक्षणही घेत नाहीत. आठ जणांचं कुटुंब – नवरा, दोघं मुलं-सुना आणि दोन नातवंडं – पोसण्याची सगळी जबाबदारी सुन्नो यांच्यावर आहे. “माझी पोरं काम करत असती तर,” त्या खेदाने म्हणतात.
या सगळ्यांमधली सगळ्यात तरुण म्हणजे ३४ वर्षांची राजन. तिचा नवरा देखील माझ्या बाबांसारखा फेरीवाला होता, पण पाच वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका येऊन तो वारला. ती आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा असं त्यांचं दोघांचं कुटुंब आहे आणि मजुरीवरच अवलंबून आहे. “नुसते [रेशनचे, स्वस्तात मिळणारे] गहू खाऊन जगायचं का? भाज्या दूध, मीठ-मसाला, तेल, गॅस सगळंच लागतं,” ती म्हणते. राजन कामाला गेली की तिची एक नात्यातली बहीण तिच्या पोराला सांभाळते.
आज आरती देखील शेतात कामाला आलीये. ३० वर्षांच्या आरतीची दोन आणि सहा वर्षांची छोटी दोघं मुलं घरीच आहेत. त्यांना सोडून ती कामाला आलीये. तिचा नवरा लक्ष्मी मेकॅनिक आहे आणि पतौडी गावाजवळ त्याचं स्वतःचं छोटं गॅरेज आहे. खाजगी शाळेची फी वाढवली आणि ती काही आता परवडण्यासारखी नाही त्यामुळे तिच्या दोन्ही मुलांना शाळा सोडावी लागलीये. आरतीला मजुरीला जाते तेव्हा मुलं आजी-आजोबांकडे असतात.
सूर्य मावळला की सगळ्या बाया ट्रॅक्टरवर बसून आपापल्या घराच्या वाटेने निघतात. रात्रीच्या जेवणासाठी काय करायचं याचीच चर्चा सुरू असते. माझी आईसुद्धा १०-१२ तास शेतात काम करून, चिखलाने माखून, दमून भागून घरी येते.
घरातल्या कर्त्या-कमावत्या असूनही घरकामाचा रगाडा मात्र त्यांना चुकत नाही. ट्रॅक्टरवरून उतरून घरात पाऊल ठेवलं की रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू होते. खरकटी भांडी घासायची, दिवसभराची खबरबात ऐकून घ्यायची, कपडे भिजत घालायचे, धुवायचे, जेवणानंतर पुन्हा एकदा भांडी घासून टाकायची आणि त्यानंतर सार्वजनिक नळावर पाणी भरायसाठी थांबायचं.
मोठ्या मुली कामं करू लागतात. पण राजन आणि सुन्नोसारख्यांना, ज्यांना मुली नाहीत किंवा अगदी लहान आहेत, त्यांना सगळं काम स्वतः करावं लागतं. मुलग्यांनी घरकामात मदत करावी ही अपेक्षाच नसते. “घरकाम हे मुलींचं काम आहे,” हाच सगळ्यांचा समज आहे.
आम्हा चार भावंडांपैकी कुणालाही आपल्याला जे कष्ट करावे लागतायत ते लागू नयेत एवढीच माझ्या आईची इच्छा आहे. आम्हाला सगळ्यांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात असं तिला वाटतं. माझा थोरला भाऊ हरिराम इंजिनियर झालाय आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतोय. माझ्या मोठ्या बहिणीने नुकतीच मास्टर्स इन डेव्हलपमेंट स्टडीज ही पदवी प्राप्त केली आहे आणि शेजारच्याच मध्य प्रदेशमधल्या एका शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थेत ती सध्या नोकरी करतीये. मी आणि माझी बहीण पदवीचं शिक्षण घेतोय आणि आम्हालाही ‘बऱ्यापैकी’ सरकारी नोकऱ्या मिळाव्यात अशी आईची इच्छा आहे.
आमच्या आई-वडलांनी आमच्या शिक्षणाला कायम प्राधान्य दिलंय. आमच्या गावात किंवा समाजातल्या कुणीही खाजगी शाळांमध्ये मुलांना घातलं नव्हतं तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला. आणि खाजगी शिक्षण परवडत नसलं तरी सगळा खर्च उचलण्यासाठी त्यांना खूप कष्ट केले. हे बिलकुल सोपं नव्हतं पण त्यांच्या मनात जिद्द होती.

चौथीत असताना माझ्या भावाने काही दिवस शाळेला दांडी मारली होती. वडलांना कळलं तेव्हा ते भयंकर संतापले. त्यांच्या हातून माझ्या भावाने असा काही मार खाल्लाय. शाळा सोडायची हा पर्यायच नाही हे त्यांनी त्याला खडसावून सांगितलं. त्यानंतर त्याने एकदाही शाळा बुडवली नाही. तो पाचवीत असताना माझ्या आई-वडलांनी शाळेतल्या शिक्षकांना त्याचा रेवारीतल्या नवोदय विद्यालयाचा अर्ज भरायला सांगितला. माझ्या भावाला पुढे त्या शाळेत घातलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच तिथे शिक्षण घेतलं.
माझी आई नेहमी म्हणायची की तिला शिकता आलं असतं तर तिचं आयुष्य आज आहे त्यापेक्षा नक्की वेगळं असतं. माझे वडील आठवीपर्यंत शिकलेले होते. पण त्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि रोजंदारीवर कामं करायला लागले. असं सगळं असूनही आई किंवा बाबा दोघांनीही आमच्यासाठी हा रस्ता कायमचा बंद केला. पण मला अभ्यासाला बस असं ओरडलेलंही कधी स्मरणात नाही. आम्हाला आपसूकच कळालं की अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि आम्ही स्वतःच तो करत राहिलो. रोज शाळेतून परत आलो की आम्ही निमूट अभ्यासाला बसायचो.
एवढ्या वर्षांमध्ये आमच्या नातेवाइकांचे आणि आमच्या जटाव [हरयाणामध्ये अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट] समाजाच्या लोकांचे टोमणे, टीका आईला ऐकावी लागलीये. का तर तिने आम्हाला लहानपणापासून खूप स्वातंत्र्य दिलं, खास करून माझ्या बहिणींना, म्हणून. पण ही सगळी बोलणी ती कानाआड करते. मुलींची लहान वयातच लग्नं लावण्याऐवजी शिक्षण घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने पुरेपूर पाठिंबा दिलाय. तेही स्वतः शाळेचा वर्ग आतून कधीही पाहिला नसला तरीही.
“माझं आयुष्य तर गेलं. पण आता माझी जी काही धडपड सुरू आहे ती केवळ तुमच्यासाठी. तुमचं आयुष्य बदलावं, चांगलं व्हावं म्हणून,” रात्री तिच्याशी बोलत असताना ती सांगते.
“माझ्या आयुष्याची गाडी चाललीये, नुसती चाललीये.”
अनुवादः मेधा काळे
Editor's note
रमण रेवारिया बंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेत आहे. २०२१ साली त्याने पारी एज्युकेशनसोबत इंटर्नशिप केली होती. तेव्हा त्याने ही गोष्ट लिहिली. तो म्हणतोः “परीघावर फेकल्या गेलेल्या बायांचा संघर्ष माध्यमांमधून फार क्वचित पहायला मिळतो. त्यांचं आयुष्य फार वेगळं असतं. मी माझ्याच आईची गोष्ट सांगायचं ठरवलं कारण मला सगळ्यात जास्त प्रेरणा मिळते ती तिच्याकडून. पारीने मला ही संधी दिली आणि त्यांच्या मदतीने मला तिच्या आयुष्याची कहाणी सर्वांना सांगता आली.”
पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवादक आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.