ही कहाणी प्रथम हिंदीत प्रकाशित झाली. पारी एज्युकेशन भारतभरातील विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांसोबत मिळून काम करतं. तुम्ही आमच्यासाठी तुमच्या पसंतीच्या भाषेत लेखन, रेखाटन आणि वृत्तांकन करू शकता.

“या टोपल्या बनवून विकल्या तरी आमचे खर्च भागत होते,” निर्मला देवी घरभर नजर फिरवून म्हणतात. बांबूच्या लहानमोठ्या काड्या-कामट्या आणि अर्धवट तयार असलेल्या टोपल्या दोन्ही खोल्यांमध्ये विखुरल्या आहेत. “कोरोना आल्यापासून लोकांनी टोपल्या विकत घेणंच बंद केलं. म्हणून आम्ही त्या बनवणं बंद केलं,” त्या म्हणतात.

फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्नाच्या हंगामात त्यांचा माल विकला गेला, तो अखेरचा. २०२० मध्ये त्यांचा धंदा जवळपास ठप्प झाला होता. “कोरोनाच्या आधी आम्ही आमच्या गावी दारोदार फिरून टोपल्या विकत होतो,” निर्मला यांचे पती, गुलवंश म्हणतात. “ज्यांनी ऑर्डरी दिल्या आहेत ते स्वतः येऊन टोपल्या घेऊन जायचे,” पुढे ते म्हणतात.

निर्मला, ५०, आणि त्यांचे पती, गुलवंश सिंह, ५८, पालमपूर तालुक्यातील रछियारा या लहानशा पाड्यामध्ये राहतात. १,८९,२७६ एवढी लोकसंख्या असलेला हा जिल्हा बहुतांशी ग्रामीण असून त्यातील लोक लहानशा पाड्यांमध्ये आणि १५६ गावांमध्ये राहतात. रछियारा येथून सर्वांत जवळचं गाव द्रम्मन असून त्याची लोकसंख्या ६६२ एवढी आहे (जनगणना २०११).

हिमाचल प्रदेशाच्या कांगडा जिल्ह्यातील त्यांचं कच्चं घर साहजिकच देवदार, संत्र आणि सफरचंदाच्या झाडांनी वेढलेलं आहे. हे दांपत्य दूमना समाजाचं (राज्यात अनुसूचित जातीत समाविष्ट) असून बांबूच्या टोपल्या विणण्यात त्यांचं अवघं आयुष्य गेलंय.

हिमालयाच्या कांगडा जिल्ह्यात जिथे पहाल तिथे धौलाधार पर्वतरांगा नजरेस पडतात. धौलाधार अभयारण्य एकूण ९५,७६९ हेक्टर वनक्षेत्रावर पसरलं आहे. त्यांचं गाव ज्या पालमपूर भागात आहे तिथे चहा हे प्रमुख पीक आहे. चहा खुडणारे लोक आपल्या पाठीवर बांबूच्या टोपल्या बांधून त्यात खुडलेली पानं टाकत जातात. या टोपल्या धान्य साठवून ठेवायला आणि बाळाचा पाळणा म्हणूनही वापरल्या जातात.

“माझे आईवडील हे काम करायचे अन् मी ते त्यांच्याकडून शिकले,” निर्मला सांगतात. त्यांच्या कुटुंबाला परवडत नसल्याने त्या कधी शाळेत गेल्या नाहीत. वयाच्या १६व्या वर्षी त्यांचं गुलवंश यांच्याशी लग्न झालं त्यानंतर त्यांनी हे काम सुरू ठेवलं. त्यांच्या सासरचे लोकही बुरुडकाम करायचे, आणि हे तरुण दांपत्य त्यांना मदत करायचं. “दोघं मिळून आम्ही दिवसाला दोन टोपल्या बनवत होतो,” गुलवंश म्हणतात. या दांपत्याने आपलं कौशल्य आपली दोन मुलं, अमरजित आणि रणजित, यांना सोपावलं. या तरुणांना त्यांच्या पत्नी, मंजू आणि राणी, टोपल्या विणायला मदत करतात.

रणजित, ३२, आपल्या वडिलांसोबत बांबू गोळा करायला गावात आणि आसपासच्या जंगलात जातो. “बांबू सहज सापडतो,” निर्मला म्हणतात, कारण रछियाराच्या आसपास बांबूची दाट झाडी आहे. हिमाचल प्रदेशात ६६ टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. ही माणसं खांद्यावर बांबूच्या मोळ्या घेऊन लांबचा रस्ता चालत, बांबू तोलत पार करतात.

कधीकधी ते गावातल्या बाजारातून बांबू विकत घेतात. एका बांबूची किंमत रु. २५० एवढी असून त्यात तीन लहान टोपल्या किंवा एक अख्खा पाळणा (किरडा) विणला जातो. बरेचदा जे लोक टोपल्यांची ऑर्डर देतात तेच बांबू आणून देतात.

“पाळणा आणि मोठी टोपली ५०० रुपयांना विकल्या जातात आणि त्यातून आमचा १५० रुपये नफा होतो,” निर्मला म्हणतात. त्यांना आठवतं की लहानपणी त्यांचे आईवडील याच वस्तू दोन ते तीन रुपयांना विकायचे.

जानेवारी ते मे दरम्यान लग्नसराईत त्यांच्या घरी नुसती धांदल असायची. लग्नात येणारे नातेवाईक भेटवस्तू देताना या टोपल्या वापरतात आणि मुहूर्ताच्या कितीतरी महिन्यांआधी ऑर्डर देतात. मात्र, मार्च २०२० पासून मोठ्या समारंभांवर बंदी आली आणि टोपल्यांची विक्रीही थांबली.

एकदा बांबू घरी आणला की निर्मला आणि गुलवंश तो वाळवून त्याच्या पातळ पट्ट्या कापतात. गुलवंश एका सुरीने साल सोलून आतले तंतू काढतात. हे काम जोखमीचं असतं. “किरकोळ जखमा होतात आणि बोट कापून घेणं तर नेहमीचंच आहे,” ते म्हणतात.

मंजू आणि राणी बांबूची पानं तोडून टाकतात आणि गावातल्या दुकानातून रंग आणून बाबूं गुलाबी, हिरवा आणि निळ्या रंगात रंगवतात. शंभर रुपयांच्या रंगात आठ टोपल्यांना रंगवू शकतात. “आधी आठवड्यात चार ते पाच [टोपल्या] बनवत होतो. आता वय झाल्यामुळे आम्ही दोन तीनच टोपल्या बनवू शकतो,” निर्मला म्हणतात.

एकदा बांबू घरी आणला की निर्मला आणि गुलवंश तो वाळवून त्याच्या पातळ पट्ट्या कापतात. गुलवंश एका सुरीने साल सोलून आतले तंतू काढतात. हे काम जोखमीचं असतं. “किरकोळ जखमा होतात आणि बोट कापून घेणं तर नेहमीचंच आहे,” गुलवंश म्हणतात

जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असल्यामुळे बांबू शोधणं आणि त्याच्या फांद्या कापून, त्या घरी आणून वाळवणं कठीण जातं. “बांबू साठवून ठेवायला घरात जागा नाही, म्हणून तो बाहेर ठेवावा लागतो, पण तिथेही जागा नाहीये,” गुलवंश म्हणतात.

यावर तोडगा म्हणून पावसाळा येण्याच्या आधीच बांबू शोधून तो तोडून ठेवतात.

प्लास्टिकच्या वस्तू उपयोगात आल्यापासून टोपल्यांच्या विक्रीत बरीच घट झाली आहे, म्हणून घरच्या मंडळींनी इतर कामंही करायला सुरुवात केलीये. २०१५ पासून निर्मला कापणीच्या हंगामात (एप्रिल ते ऑगस्ट) चहाच्या मळ्यात काम करतायत, त्याची त्यांना रु. २०० रोजी मिळते. “पण लॉकडाऊनच्या वेळी चहाच्या मळ्यात काम कमी झालं कारण इतक्या लोकांना एकत्र काम करता येत नव्हतं. म्हणून मला खूप काही काम मिळालं नाही,” त्या म्हणतात.

गुलवंश बांधकामाच्या ठिकाणी कामं करतात, तिथे त्यांना रू. ५०० एवढी रोजी मिळते. “किती तरी काळ कामच मिळालं नाहीये. लॉकडाऊनच्या आधी काम मिळालं होतं, ते शेवटचं. तेव्हापासून कुणी घराचं बांधकामच काढलं नाहीये. आम्हाला कुठून काम मिळणार?” ते विचारतात.

अमरजित आणि मंजू एक दुकान भाड्याने घेऊन तिथे टेलरिंगचा व्यवसाय करायचे. “टेलर म्हणून आम्ही महिन्याला रू. ४,००० ते ५,००० कमवायचो. पण लॉकडाऊनचा टेलरिंगला फटका बसला आणि आमची कमाई कमी झाली,” अमरजित म्हणतो.

निर्मला आणि गुलवंश यांची तिन्ही नातवंडं इंग्रजी माध्यमाच्या एका खासगी शाळेत शिकतात. निर्मला म्हणतात की त्यांना आपल्या मुलांना केवळ इयत्ता ५ वी आणि ८वी पर्यंतच शिकवता आलं. आपल्या नातवंडांनी पुढे शिकावं आणि चांगलं आयुष्य जगावं असा त्यांचा आग्रह आहे, कारण बुरुडकाम करणाऱ्या या कुटुंबाचं भविष्य धोक्यात आहे, आणि त्यांच्या कलेचं काय होणार याची त्यांना शंका आहे. “फक्त आमच्या गावातले लोकच आमच्याकडून टोपल्या विकत घेतात आणि त्या दोन तीन वर्षं वापरतात. पण, लोक प्लास्टिकचा वापर करायला लागल्यामुळे आम्हाला भविष्याकडून फारशी काही आशा नाही,” त्या म्हणाल्या.

पारीचे हिंदी संपादक देवेश यांनी या कहाणीचे संपादन आणि सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार.

Editor's note

रितू यादव ही उत्तर प्रदेशच्या श्री विश्वनाथ पी. जी. कॉलेज, सुलतानपूर येथे बिझनेस मॅनेजमेंट या पदवीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिने पालमपूर जिल्ह्यातील द्रम्मन गावाजवळील कांडबारी पाड्यात काम करणाऱ्या सांझे सपने या एनजीओसोबत ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन या एका वर्षाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पारीसोबत इंटर्नशिप केली होती. ती म्हणते: "पारीसोबत इंटर्नशिप करण्याआधी मला वाटलं होतं की चांगली कहाणी लिहिण्यासाठी केवळ अफाट कल्पनाशक्ती पुरेशी आहे. पण निर्मलाजी आणि गुलवंशजी यांच्याशी बोलत असताना मला जाणवलं की खरी कहाणी सांगायला आणखी बरंच काही हवं. माझा कल आपण वापरतो त्या भाषा आणि शब्दावलीकडे वळला. प्रभावी कहाण्या लोकांच्या जगण्यातून, त्यांच्या संवादातून जन्म घेतात, हे मी शिकले. मला स्वतःची बलस्थानं लक्षात आली – मला निरीक्षण, संवाद, चिंतन करून कहाणी सांगता येते. लोकांना वैताग न येता त्यांची मुलाखत कशी घ्यायची, ते कळलं. माझा पहिला खर्डा मी तीन नाही पाचजा लिहिला आणि आपल्या लिखाणातल्या त्रुटी कशा शोधून काढायच्या ते मी शिकले."

अनुवादः कौशल काळू

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.