
कालीन वान (गालिच्याचा माग) बंद करून दूर सारून ठेवलाय. फातिमा बेगमच्या घरात एरवी जिथे तो असायचा तिथे आता तिच्या भावाचं, मोहम्मदचं कुटुंब वास्तव्याला आलंय. घरखर्चात कपात करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. “मे २०२१ मध्ये माझ्या भावाला करोना झाला आणि आम्ही विणकाम थांबवलं,” फातिमा बेगम सांगते. त्या आणि त्यांचे पती नझीर अहमद भट गेल्या २५ वर्षांपासून गालिचे विणतायत. कश्मीरच्या बंदीपोर जिल्ह्याच्या गुंद प्रांग गावचे ते रहिवासी आहेत.
फातिमा यांचा धाकटा भाऊ मोहम्मद अश्रफ, वय ३२ महामारीच्या आधी टॅक्सी चालवायचा. पण टाळेबंदी लागली आणि त्याचं काम थांबलं. तो गावातल्या टॅक्सी स्टँडवर काम करायचा आणि महिन्याला ६,००० रुपये कमवायचा. “त्याने २०१९ साली आपली टाटा सुमो विकली. जुन्या गाड्या काढून टाकण्याचा आदेश आला होता,” मोहम्मदची बायको शाहजादा सांगते. मोहम्मद दमेकरी असल्याने कोविडची लक्षणं आणखीच तीव्र झाली आहेत. त्याला त्रास होत असल्याने बोलण्याचं सगळं काम तीच करते.
मार्च २०२० मध्ये लॉकडाउल लागला, मोहम्मदला टॅक्सी चालवणं देखील शक्य नव्हतं. तेव्हा सुमो विकून आलेल्या एक लाखामध्येच त्यांनी पुढचं वर्षभर गुजराण केली. त्यांची मुलं, मुनीर, वय १२, अर्सलन, वय १० आणि आदिल, वय ६ आजही गावातला एका पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलाकडे शिकवणीला जातात. तिघा मुलांच्या शिकवणीचा खर्च, वह्या-पेन्सिली सगळं धरून महिन्याला ३,००० रुपयांपर्यंत जातो.


मोहम्मद रोजंदारीवर जात राहिला. झेलमच्या किनाऱ्यावर वाळू उपशाचे त्याला दिवसाला ५०० रुपये मिळायचे. पण त्याच्या दम्यामुळे त्याला रोज काम जमायचं नाही.
२१ मे २०२१ रोजी मोहम्मदला धाप लागायला लागली. मदतीसाठी शाहजादा शेजारीच फातिमा आणि नझीरच्या घरी धावत गेली. हाजिनमधल्या स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका बोलवायची होती, पण तिथे कुणाशीच संपर्क होऊ शकला नाही. “माझे पती, मुलगा आणि भाऊ तीनचार किलोमीटर चालत गेले, मग कुठे त्यांना हॉस्पिटलला जायला वाहन मिळालं,” आजारी माणसाला एवढा प्रवास करावा लागला ते फातिमा सांगतात.
३ लाख लोकसंख्या असलेल्या बांदीपोर जिल्ह्यामध्ये तीन सामुदायिक आरोग्य केंद्रं आहेत. हाजिनच्या दवाखान्यात आल्यावरही तिथे मदतीला फारसं कुणी नव्हतं. मोहम्मदला कोविड झाल्याचं निदान झाल्यानंतरही नाही. “डॉक्टर रुग्णांच्या जवळ देखील येत नव्हते,” नझीर सांगतात. मोहम्मदला पुढच्या दिवशी ऑक्सिजन लावावा लागणार होता. बांदिपोरा गावात ऑक्सिजनची सेवा असणारं एकमेव हॉस्पिटल म्हणजे बांदिपोरा जिल्हा रुग्णालय (डीएचबी). मोहम्मदला तिथे हलवण्यासाठी जे काही करणं गरजेचं होतं ते घरच्यांनी झटकन केलं.


“मी अँब्युलन्समध्ये कुराणातल्या आयता म्हणत होतो. तो प्रवास माझ्या आयुष्यातला सगळ्यात लांबचा आणि सगळ्यात खडतर प्रवास होता,” आपला मेहुणा मोहम्मद याला घेऊन २२ किलोमीटरवरच्या डीएचबीला गेलेले नझीर म्हणतात.
मोहम्मदची बायको शाहजादाला नववा महिना लागलाय. कुठल्याही क्षणी बाळ होईल अशी स्थिती आहे. आपल्या नवऱ्याची काळजी आणि चिंता लागून राहिलेली शाहजादा म्हणते, “आम्ही जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केलं आणि दुसऱ्या दिवशी मी माझी कानातली विकली. ८,००० रुपये मूळ किंमत होती पण ४,५०० रुपयांत विकली. मुलांसाठी काय काय आणायचं होतं, घरातला खर्च आणि दवाखाना.” घरातलं सगळं पाहणं अवघड व्हायला लागल्यावर शाहजादा तिची चार मुलं आणि म्हातारी सासू रजा बेगम यांना घेऊन फातिमाकडे मुक्कामाला आली.



Left: Shahzada Bano getting a pregnancy check-up at CHC Hajin in Bandipore district. Right top: Ten-year-old Arsalan is one of Shahzada and Mohammad’s four sons. Bottom: Shahzada with her two-year-old son Azaan. Photos by Umar Para
जिल्हा रुग्णालयात, नझीर मोहम्मदची काळजी घेतायत. “ऑक्सिजन कॉन्संट्रेरसकट त्याला मोरीत न्यावं लागतं. त्याला खाणं द्यायचं, औषधं द्यायची, डॉक्टरांशी बोलायचं,” नझीर यांचा मुलगा, २१ वर्षांचा वासीम सांगतो. बांदिपोरच्या सुंबलमधल्या शासकीय पदवी महाविद्यालयाचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असणारा वासीम गेल्या महिनाभरात एकाही ऑनलाइन वर्गाला बसू शकलेला नाही. “माझ्या मोठ्या भावाला, मशूकला १० वी नंतर शाळा सोडावी लागली होती आणि घराला हातभार म्हणून काम सुरू करावं लागलं होतं. जमशीदा [बहीण] अंशतः अंध आहे आणि ती काही नववीच्या पुढे शिकू शकली नाही. फक्त मी आणि माझी धाकटी बहीण असीफा शिकू शकलो,” तो सांगतो.
मोहम्मदची तब्येत खालावायला लागली आणि त्याला श्रीनगरच्या शेर-इ-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, श्रीनगरमध्ये हलवावं लागलं. तिथे तीन आठवडे उपचार केल्यानंतर अखेर त्याला घरी सोडण्यात आलं. घरी आल्यानंतरही खर्चातून काही सुटका मिळालेली नाही. मे महिन्यात या कुटुंबाने शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून २५,००० रुपये उसने घेतले. नातेवाइकांनीही मदत केली. “मामूच्या दवाखान्याच्या बिलावरच ५७,००० रुपये खर्च झालेत. बाकी किती तरी राहिलाय,” वासीम सांगतो. कर्जाचा घोर त्याच्या बोलण्यातून जाणवत राहतो.
कोविडनंतर घ्यायची काळजी वेगळीच. मोहम्मदसाठी ही सोय करणं नझीर आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यावश्यक आहे. “गावातल्या औकफ (वक्फ असंही लिहिलं जातं) समितीने त्याच्यासाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची सोय केली आहे. त्याला दिवस रात्र त्याची गरज भासत आहे. पण आमच्या इथे दर दोन तीन तासाला वीज जाते त्यामुळे आम्हाला दिवसाला ५०० रुपये भाड्याने जनरेटर आणावा लागलाय. त्याच्यासाठी डिझेलवर १,२०० रुपये खर्च येतोय,” नझीर सांगतात.
नझीर यांचा थोरला मुलगा माशूक, वय २५ मिळेल ती रोजंदारीची कामं करतोय. बहुतेक वेळा गावातल्या किंवा आसपासच्या बांधकामावर तो कामाला जातो. त्याला त्याच्या श्रमाचे दिवसाचे २०० रुपये मिळतात. १० लोकांचं हे कुटुंब आता या कमाईवर आणि नातेवाइकांच्या मदतीवर गुजराण करतंय. रोजचा दिवस म्हणजे युद्धाचा प्रसंग असल्याचं फातिमा सांगतात.


मोहम्मदचं कुटुंबही इथेच रहायला आल्यानंतर तिनातल्या एका खोलीत असलेला माग बंद करून ठेवण्यात आला. दहा जणांसाठी जागा करायची होती. फातिमा आणि नझीर यांचं गालिच्याचं काम थांबलं. “गेल्या वर्षी आम्ही कालीन विणायला सुरुवात केलीये, पण तो गिऱ्हाइकाला दिल्यानंतरच त्याचे पैसे आम्हाला मिळतील,” त्या सांगतात. या गालिचाचे त्यांनी २८,००० रुपये मिळतील. श्रीनगरच्या एका दुकानदाराशी त्यांचा करार झालाय. तो आपल्या चारचाकीने इथे येतो, नक्शी, गालिच्याचा कच्चा माल म्हणजे पन्न (सूत आणि मेंढीच्या लोकरीचा एकत्र धागा) आणि रंग सोबत घेऊन येतो.
फातिमा सांगतात की रोजचे आठ तास, आठवड्याचे सहा दिवस असं दोघांनी मिळून काम केलं तर त्यांना पाच फूट बाय सहा फूट गालिचा तयार करायला एक पूर्ण वर्ष लागतं. “आमचं लग्न झाल्यानंतर मी नझीरकडून ही कला शिकले. माझं वय १५ आणि त्यांचं १६ होतं,” फातिमा सांगतात. “५ रुपये रोज होता तेव्हापासून मी कालीन-काम करतीये. आतासुद्धा आम्ही जे काही कमावतोय [८० रुपये रोज], ते पुरेसं नाही,” नझीर म्हणतात.
२०११ च्या जनगणनेनुसार हजन या गावात तयार होणारी आणि निर्यात होणारी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे गालिचा. हे गाव फातिमा आणि नझीरच्या घरापासून केवळ सहा किलोमीटरवर आहे. तरी देखील त्यांच्यासारख्या गालिचे विणणाऱ्या कुटुंबांची स्वतःचं भागेल इतकी काही कमाई या कामातून होत नाही. सप्टेंबर महिन्यात सफरचंदांचा हंगाम सुरू झाला की नझीर ४०० रुपये रोजावर बागांमध्ये मजुरीला जातात. पण हे काम केवळ १० दिवस मिळतं. जून किंवा जुलै महिन्यात चार-पाच दिवस भाताची पेरणी करूनही त्यांना इतकीच मजुरी मिळते.
नझीर आणि फातिमा यांची आधीच नाजूर असलेली आर्थिक परिस्थिती दवाखान्याच्या खर्चासाठी घेतलेल्या कर्जांमुळे आणखीच बिघडत चालली आहे. आणि त्यांना खात्रीने पैसे मिळवून देणारं गालिचा विणण्याचं कामही जागेपायी त्यांना बंद ठेवावं लागलंय. शाहजादाला त्यांचा आधार आहे म्हणून आणि मोहम्मद आता दवाखान्यातून घरी आलाय म्हणून त्यांची ऋणी आहे. आता मोहम्मद घरी आहे आणि शाहजादाचं बाळ कोणत्याही क्षणी या जगात येईल. कर्जाचा बोजा वाढतच चाललाय.
Editor's note
उमर पारा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून पत्रकारितेतील पदवीचं शिक्षण घेतोय. गेल्या काही वर्षांपासून तो छायाचित्रणही करतोय. तो म्हणतो, “पारीवर कहाणी कशी सांगितली जाते ती प्रक्रिया मला खूप शिकवून गेली. छोटे तपशीलही महत्त्वाचे असतात ते मी शिकलो. एखाद्याच्या नावाचं स्पेलिंग ते जनगणनेमध्ये एखाद्या गावाची नोंद असे सगळे तपशील मला तपासावे लागले होते. आपली गोष्ट जास्तीत जास्त सच्ची कशी होईल यासाठी आकडेवारी कशी गोळी करायची हे या संपूर्ण प्रक्रियेतून मला शिकता आलं.”
पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवादक आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.