
माझा दहावीचा निकाल होता. निकाल लागेपर्यंत माझी अवस्था क्रिकेटच्या बॉलसारखी झाली होती. सगळ्यांचं लक्ष बॉलवर असतं. आता चौका जातो का छक्का? सगळे फक्त चेंडूकडे बघत असतात. मी नापास झाली असती तर? तर माझ्या बाबानी लगेच माझं लग्नं लावून दिलं असतं.
२९ जुलैला दहावीचा निकाल लागला. मला ७९.६०% मिळाले. शाळेत माझा तिसरा नंबर फक्त एका पॉईंटने निसटला. आमच्या नाथजोगी समाजात आतापर्यंत एकही मुलगी दहावी पास झाली नाहीये. या वर्षी आमच्या समाजाच्या आणखी तिघी जणी परीक्षेत पास झाल्या.
मी नाव खुर्द [ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा] नावाच्या छोट्या गावी राहते. आमच्या गावात फक्त आमच्याच समाजाचे लोक राहतात. आमचे लोक इथून पुणे, मुंबई, नागपूरला जाऊन भीक मागायचं काम करतात. माझ्या आई-बाबासारखे बाकी काही जण आजूबाजूच्या गावात मजुरीला जातात.
माझे आई-बाबा – भाऊलाल साहेबराव सोळंके, वय ४५ आणि आई द्रौपदा सोळंके, वय ३६ – शेतात मजुरीला जातात. गहू, ज्वारी, कपास किंवा सोयाबीनचं काम असतं. आठ तासाच्या मजुरीचे प्रत्येकी २०० रुपये मिळतात. सध्या कसं सगळेच काम शोधून राहिलेत आणि कामं नाहीत नं, त्यामुळे त्यांना महिन्याला कसं तरी करून १०-१२ दिवसांचं काम मिळतं.
माझ्या बाबानी पाचवीत शाळा सोडली आणि तो मजुरी करायला लागला. माझ्या दोघी बहिणी आहेत मोठ्या. रुक्मा, वय २४ कधीच शाळेला गेली नाही आणि नीना, वय २२ पाचवी शिकली. दोघींची आता लग्नं झालीत. शाळा सुटली तशी त्या मजुरीच करतायत. माझा भाऊ, देवलाल २० वर्षांचा आहे. तो पण मजुरी करतो. त्यानी नववीत शाळा सोडली.
मी दहा वर्षांची झाली ना तेव्हा बाबा म्हणाला, “तू पण आता कामाला जात जा. नको जाऊ शाळेत.” तो एकटाच नाही, शाळेत जाताना रोज मला गावातली काकू भेटते. एक दिवस रागावून ती बोललीः “तुझ्या बहिणी नाय शिकल्या, तू काहून शिकू र्हायली? शिकूनशनी तुला का नोकरी लागणारे का?”
माझे एक काका सारखं माझं लग्न लावायला बाबाच्या मागे लागलेत. काकामुळे बाबाही लग्नाच्या गोष्टी करतात. मी आईला सांगते, “बाबाला सांग ना, माझ्यासमोर आणि कुणासमोरच माझ्या लग्नाची गोष्ट काढू नका. मला शिकायचंय.”
नंतर, मी दहावी पास झाले नं तेव्हा माझी मुलाखत घ्यायला एक पत्रकार घरी आले होते. माझा बाबा तर रडतच होता. त्यांना तो म्हणाला, “माझ्या पोरीनं माझं ऐकलं नाही, शाळा शिकली, तेच बरं केलं.”
‘तू कशासाठी शिकू र्हायली’
मी शाळेत गेले तेव्हा सात वर्षांची होते. शाळेत जाणाऱ्या सगळ्या पोरींची नावं घ्यायला शेजारच्या पळशी सुपो गावातले दोन शिक्षक माझ्या गावी आले होते. कुणी तरी माझं नाव दिलं आणि मग मी तिथल्या सरकारी शाळेत पहिलीत जायला लागली.
एका वर्षानी आमच्या गावातच चौथीपर्यंत शाळा सुरू झाली. मग मी तिथे जायला लागली. पाचवीत मी जळगाव जामोदच्या महात्मा फुले नगर परिषद विद्यालयात जायला लागली. हे तालुक्याचं गाव आहे, आमच्या गावापासून १४ किलोमीटरवर. शाळेत जायला आधी दोन किलोमीटर पायी जायचं मग काळी पिवळी पकडून गावातल्या बसस्टँडवर. तिथून एक किलोमीटर चालत शाळेत पोचायचं. ऑटोनी इकून तीस आणि तिकून तीस रूपये लागतात. आमच्या गावातल्या सहा जणी आम्ही एकाच शाळेत आहोत त्यामुळे आम्ही एकत्रच जातो.
एक दिवस आम्ही सगळ्या जणी शाळेत जात होतो. ओढ्याला पूर आलेला. मेन रोडला जायचं तर ओढा पार करून जावं लागतं. एरवी गुडघाभरच पाणी असतं, आम्ही चपला हातात घेतो, सलवार वरती दुमडून पाणी पार करतो. पण त्या दिवशी कंबरेइतकं पाणी होतं. म्हणून मी काठावर उभ्या आमच्या गावातल्या एका माणसाला म्हणाली, “काका आम्हाला पलिकडं सोडा ना!” आमच्याकडं पाहून ते काका चिडून म्हणाले, “का गं? जा ना, घरीच रहा नं. कशाला जाऊ र्हायल्या? एवढा पूर आला नदीला न् तुम्ही कुठं शिकू र्हायल्या? मुलींनी घरीच बसावं, कशासाठी शिकावं मुलींनी?” त्या दिवशी आमची शाळा बुडली. दुसऱ्या दिवशी सर रागावले, कारण त्यांना वाटलं आम्ही खोटं बोलू र्हायलो. त्यांनी आम्हाला वर्गाबाहेर उभं केलं.
तेव्हा मी माझ्या आईला त्यांच्याशी बोलायला लावलं. तेव्हा त्यांना पटलं. नंतर, ते आमच्या गावी आले आणि आम्ही सांगत होतो ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं.
ऑटोनी जायचं तर खूप पैसे लागतात. मी नववीत होते तेव्हा जळगाव जामोदच्या परिवहनच्या ऑफिसमध्ये एक अर्ज द्यायचं ठरवलं, आमच्या गावात सकाळी ९ वाजता बस पाठवा म्हणून. मानव विकासची बस फक्त आमच्यासाठी, मुलींसाठी असते. तिकिट नसतं पण ती गावात उशीरा, ११.३० वाजता येते. त्या बसनी शाळेत जायला उशीर होतो.
आम्ही बसनी जाणाऱ्या सगळ्या १६ जणींनी अर्जावर सह्या केल्या. इथनं चार किलोमीटरवर इस्लामपूरला राहणाऱ्या दोघींनी पण सही केली.
एसटी स्टँडवरचे सर म्हणाले, “उद्या येईल गाडी ९ वाजता तुमच्या गावात येईल.” दुसऱ्या दिवशी गाडी लवकर आलीसुद्धा. मला खूप आनंद झाला! पण नंतर गाडी आलीच नाही म्हणून मी स्टँडवरच्या सरांकडे चौकशी केली. तर ते म्हणाले, “ती गाडी दुसर्या गावावरून येते. त्या गावचे लोक तक्रार करतात. मी फक्त तुमच्यासाठी गाडी लवकर सोडू शकत नाही.” ते म्हणाले, तुम्हीच क्लासची वेळ बदलून घ्या. तसं कसं होईल बरं?
बसनी जायचं तर बाकी पण त्रास होतो. एकदा मी आणि माझ्या मैत्रिणी महामंडळाच्या बसमध्ये चढलो. पण एका मुलानं माझ्या मैत्रिणीची ओढणी ओढली आणि तो ओरडला, “तुम्ही मोहिदेपूरच्या मुली, बाहेर व्हा तुम्ही!” सगळी पोरं कल्ला करू लागली. मोहिदेपूर हे आम्हा नाथजोगी समाजाचं गाव. आम्ही नाथजोगी मुलींनी गाडीत चढू नये, असं त्या पोरांना वाटत होतं. मी चिडली आणि जळगाव जामोद आल्यावर त्याला बसस्टँडच्या सरांकडे घेवून गेली. मग बसमधले कंडक्टर त्या मुलांना म्हणाले, “ही बस सर्वांसाठी आहे. तुम्ही कशासाठी भांडणं करता?” बसमध्ये अशी भांडणं होतात. म्हणून मग आम्ही ऑटोनेच शाळेला जातो.


सरकारी शाळेत आठवीपर्यंत पुस्तकं शाळेतच मिळतात, गणवेश पण नसतो. पण ९ वी नंतर पुस्तकं, वह्या आणायला लागतात, त्याचे १,००० रुपये. आणि शाळेच्या गणवेशाचे प्रत्येकी ५५० रुपये. माझ्याकडे फक्त गणवेशापुरते पैसे होते. एका टर्मच्या ट्यूशनची फी ३,००० रुपये होती. मला एकाच टर्मची फी परवडत होती. मग दुसऱ्या टर्मला मी आमच्या शाळेतल्या सरांना अभ्यासात मदत करा म्हणाली.
इतका सगळा खर्च होतो, मग मी नववीच्या आधी उन्हाळ्यात आई-बाबा बरोबर शेतात कामाला जायला लागली. मी पहाटे चारला उठायची. पाच वाजेपर्यंत अभ्यास. तोवर सकाळीच आई-बाबा न भाऊ शेतात मजुरीला जायचे. मग तासभर अभ्यास करून मी त्यांच्यासाठी भाजी भाकरी करायची. त्यांचा डबा घेवून मीही शेतावर जायची.
मग मीही मजुरी करायची. तासाला पंचवीस रूपये. सकाळी सात ते नऊपर्यंत मी मजुरी करते. साडेनऊला आवरून मी शाळेला निघायची. शाळेतून आल्यावर पुन्हा मी मजुरीला जायची.
‘मला जिंकायला आवडतं’
गेल्या वर्षी [२०१९] जल शक्ती अभियानच्या तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत मला ट्रॉफी मिळाली. बुलडाण्यातल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात मी सेंद्रीय खतांवर केलेल्या प्रोजेक्टला तिसरा नंबर मिळाला. शाळेत धावण्याच्या स्पर्धेतही माझा दुसरा नंबर आला. मला असं जिंकायला आवडतं. आमच्या नाथजोगी समाजाच्या मुलींना कधीच असं जिंकायला, शिकायला मिळत नाही.

ऑगस्ट महिन्यात जळगाव जामोदच्या न्यू ईरा स्कूलमध्ये ११ वी – १२ वी साठी मला प्रवेश मिळालाय. ही शाळा खाजगी आहे आणि वर्षाला पाच हजार रुपये फी आहे. मी विज्ञान शाखेला प्रवेश घेतलाय – गणित, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवशास्त्र. इतिहास विषय पण घेतली मी. कारण नागरी सेवा परीक्षेसाठी त्याचा उपयोग होतो असं मला सगळे म्हणाले. माझे प्राथमिक शाळेतले सर आहेत ना – श्री. भाऊलाल बाबर, ते पण आमच्याच गावातले आणि आमच्याच समाजातले आहेत. त्यांनी नेहमीच मला मदत केलीये. मी आता १८ वर्षांची झालीये. आयएएसला प्रवेश घ्यायचं माझं स्वप्न आहे.
पदवीच्या शिक्षणासाठी मला पुण्याला किंवा बुलडाण्याला जावं लागेल. तिथे विद्यापीठ आहे ना. लोक म्हणतात मी बस कंडक्टर किंवा अंगणवाडी ताईचं काम करायला पाहिजे कारण मग लगेच नोकरी लागेल नं. पण मला जे व्हायचंय ना तेच मी होणारे.
मला अभ्यास करून एक दिवस मोठी अधिकारी व्हायचंय. मग आमच्यासारख्या गरीब माणसांना कामासाठी लाच द्यावी लागणार नाही. मी १५ वर्षांची होती नं, तेव्हा आमची झोपडी आहे ती जमीन नावावर करण्यासाठी बाबाची धडपड चालू होती. ती जमीन माझ्या आजोबाच्या नावावर होती आणि त्याने माझ्या बाबाला दिली. गावातला एक माणूस ते काम करू शकला असता. त्याने माझ्या बाबाकडं पाच हजार रूपये मागितले. माझ्या बाबाकडं पैशे नाहीत. आम्ही त्याला विनवलं, पण पैशाशिवाय तो काम करत नाही म्हणाला. आमच्या नावावर घर नसलं तर घरकुल साठी सरकारी अनुदान येतं ते पण आम्हाला मिळणार नाही नं.
असं कुणाशी व्हायला नको. माझ्या समाजाच्या लोकांचे हक्क काय आहेत ते मला त्यांना समजून सांगायचंय. मग ते मोठ्या लोकांना घाबरणार नाहीत. आमचा समाज भीक मागून जगतो. ते पण मला थांबवायचंय. आणि पोरींचे बालविवाह होतात तेही थांबवायचेत. फक्त भीक मागून स्वतःचं पोट भरता येतं असं काही नाही. शिक्षणानी सुद्धा तुम्ही चार घास खाऊ शकता.
आता गावात लॉकडाऊनमुळे सगळे घरीच आहेत. त्यामुळे मजुरीला लोकही जास्त झालेत. आम्ही पण घरीच आहोत आणि मजुरीच मिळत नाहीये. माझ्या ॲडमिशनसाठी बाबानी गावातल्याच एका काकाकडून कर्ज काढलंय. पण ते फेडायचं कसं फार अवघड आहे. त्यासाठी पडेल ते काम करू, पण आम्ही भीक नाही मागणार.
प्रशांत खुंटे पुणे स्थित स्वतंत्र मराठी पत्रकार आहे, त्याने या लेखासाठी मदत केली आहे.
अनुवादः मेधा काळे
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.