
ही कहाणी मुळात मराठीमध्ये लिहिली आहे. भारतभरातले वार्ताहर, विद्यार्थी पारीसाठी आपल्या भाषेत लिहीत आहेत.
“मला लोक चंदू मिस्त्री म्हणून ओळखतात.”
ही ओळख फक्त आणि फक्त गेली तीस वर्षं मी बनवत असलेल्या बैलगाड्यांमुळे मिळाली आहे असे चंद्रकांत मिस्त्री आजही अभिमानाने सांगतात. “१९८५ साली मी एका खाजगी कंपनीमध्ये वेल्डिंगचे काम करत होतो. त्यावेळी असा विचार आला की आपण एखादी लोखंडी बैलगाडी तयार केली तर?” ते सांगतात.
चंदू मिस्त्री यांना आत्ताच्या घडीला एक बैलगाडी तयार करायला एक ते दोन दिवस लागतात. पण सुरुवातीला एक बैलगाडी पूर्ण करण्यासाठी कमीत कमी पाच ते सात दिवस लागायचे. त्यांचा मुलगा, ३५ वर्षीय सुहास पाटील गेली जवळपास वीस वर्षं, वयाच्या १६ व्या वर्षीपासून त्यांना या कामात मदत करतोय.
जसजसा काळ बदलत गेला तस तसं बैलगाडीच्या रचनेमध्ये बदल होत गेले.


“मी हरतऱ्हेच्या गाड्या तयार करतो,” चंद्रकांत सांगतात. लोकांना बैलगाडी म्हणजे फक्त एकच बैलगाडी माहित आहे. “यामध्ये पाच प्रकारच्या बैलगाड्या आहेत. साडेतीन फुटी गाडी शेतीसाठी वापरली जाते. त्यानंतर साडेचार फूट. आम्ही तिला सहा आणे म्हणतो. पाच फुटी बैलगाडी म्हणजे आठ आणे. आम्ही साडेपाच सुद्धा तयार करतो. ती दहा आणे. आणि शेवटची, सगळ्यात लांब सात फुटी बैलगाडी म्हणजे बंदा रुपया,” चंदू मिस्त्री सांगतात.
परंपरागत लाकडी बैलगाड्या खूप वजनदार होत्या त्यामुळे वाहतूक करत असताना बैलांना जास्त ओझं व्हायचं. गाडीचं वजन केलं तर शेतकऱ्याच्या भल्याचंच आहे असा त्यांनी विचार केला.
चंदू मिस्त्री सांगलीपासून १४ किलोमीटरवर नांद्रे गावी राहतात. सुरुवातीला त्यांना गाडीसाठी लागणारं साहित्य मिळवणं अवघड जायचं.
एक बैलगाडी करायला बरंच साहित्य लागतं: लोखंडी पाइप, अँगल, चॅनल, लाकडी जू, लोखंडी शाफ्ट, लाकडी दांडे, जुन्या टायरचं रबर, वेळूच्या लाकडी चिवट्या तसंच लोखंडी पाइप लागतात. “मला रबर सांगलीत मिळायचं नाही, मग पुण्यात कात्रजहून मागवाया लागायचं,” ते सांगतात.
आता सांगलीत सगळं साहित्य मिळतं पण किंमती खूप वाढल्या आहेत. “१९९० मध्ये १२ रुपयाला एक रबर आणत होतो. तेच आज मी सांगलीत अडीचशे रुपयाला खरेदी करतोय. त्यावेळी एक चिवटी ३५ रुपयांना मिळत होती. आज तिची किंमत आता सहाशे रुपये झाली आहे,” ते सांगतात.


सांगली, जत, सोलापूर, सांगोला आणि बीड जिल्ह्यात लोखंडी बैलगाड्यांना मोठी मागणी आहे. चंदू मिस्त्रींना शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही गाड्यांसाठी मागणी असते.
बैलगाडा शर्यतींमध्येही लोखंडी गाड्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. पूर्वी शर्यतीसाठी लाकडी बैलगाडी वापरली जायची यामध्ये बैलांना इजा होण्याचे प्रमाण जास्त होते शर्यतीच्या वेळी लाकडी चाके तुटत होती. लोखंडी गाड्यांमध्ये असं होत नाही.
२०१७ साली बैलगाडा शर्यतींवर बंदी आली होती ती २०२१ साली सर्वोच्च न्यायालयाने उठवली. चंदू मिस्त्रींसारख्या कारागिरांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरला. ते म्हणतात, “मी गेली ३५ वर्षं गाड्या बनवतोय आणि येणार्या काळातही मी शेतकर्यांसाठी बैलगाड्या बनवण्याचे काम असेच चालू ठेवणार आहे.”








पारीमध्ये मराठी अनुवाद संपादक असणाऱ्या मेधा काळे हिने इंग्रजी अनुवाद आणि संपादनात मदत केली आहे. तिचे आभार.
पारीवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
Editor's note
अतुल अशोक होवाळे चेन्नई येथील एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी असून ही कहाणी त्याने शिक्षण सुरू असताना लिहिली होती.
चंद्रकांत पाटील यांच्या कामावर काही लिहावं असं त्याने ठरवलं कारण “आताही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी बैलगाडी फार महत्त्वाची आहे.”
अनुवादः मेधा काळे
पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवादक आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.