शेवटची सवारी सोडली त्यानंतर एक तास उलटलाय.

दिल्लीत दुपारी उन्हाचा पारा ४६ अंशाच्या वर गेलाय. रस्त्यात अगदी मोजके लोक दिसतायत. रिंकू त्यामुळेच चिंतेत आहे. “अशा दिवसांमध्ये आम्हाला भाडं जवळपास मिळतच नाही,” तो म्हणतो. बॅटरीवर चालणाऱ्या आपल्या रिक्षात तो बसून राहिलाय. न्यू गुप्ता कॉलनीच्या चौकात त्याच्या शेजारी इतर १० रिक्षावाले भाडं मिळण्याच्या प्रतीक्षेत थांबलेत.

“दुपारच्या वेळी बाहेर पडून काम करणं अवघड झालंय. लोक पण बाहेर पडेनासे झालेत,” २६ वर्षीय रिंकू सांगतो. “ऊनच आहे, थंडीच आहे म्हणून मी काम सोडून बसलो तर तिथे घरच्यांची काळजी कशी घ्यायची?” तो विचारतो.

अंदाजे ११ वर्षांपूर्वी रिंकू उत्तर प्रदेशच्या बाराबांकी जिल्ह्याच्या फतेहपूर गावातून इथे दिल्लीत आला. गावी तो सरकारी शाळेत शिकत होता पण नववीत त्याने शाळा सोडली कारण त्याचे वडील त्या वर्षी वारले. घरात थोरला असल्याने आपली आई रुक्मिणी देवी आणि धाकटी बहीण ज्योती यांची काळजी घ्यायला पाहिजे असं त्याला वाटलं होतं. “तो काळ फार कठीण होता. घरच्यांची काळजी घेण्यासाठी मला गाव सोडून इथे शहरात यावंच लागलं. गरजेचं होतं,” तो सांगतो. नोकरीची संधी असलेल्या मोठ्या शहरात जाणे एवढाच पर्याय होता.

त्यामुळे वयाच्या १५ व्या वर्षी रिंकू आपलं गाव सोडून दिल्लीला आला. इथल्या एका किराणा मालाच्या दुकानात हाताखाली काम करायला लागला, महिना १,००० रुपये पगारावर. काही काळाने त्याने ते काम सोडलं एका डेअरी कंपनीमध्ये १,६०० रुपये पगाराची नोकरी धरली. पुढची सहा वर्षं तो त्याच कंपनीत कामाला होता. कसंबसं सगळं भागवत होता. “माझ्या त्या नोकरीतून माझी काहीच कमाई होत नव्हती. घर चालवणं अवघड व्हायला लागलं होतं.”

त्यानंतर त्याने काम बदलायचं असं ठरवलं. “मी काही रिक्षावाल्यांशी बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की रिक्षा चालवून मी जास्त पैसे कमावू शकतो.”

नशीब चांगलं असेल तर कधी कधी एका दिवसात ६०० रुपये मिळतात, त्यातले निम्मे रिक्षाचं भाडं म्हणून जातात. “कधी कधी तर भाडं भरता येईल इतकाही धंदा होत नाही,” तो सांगतो. “त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे माझी बॅटरीवरची रिक्षा असल्यामुळे मला पेट्रोलच्या वाढत्या किंमतींची चिंता करावी लागत नाही.” बॅटरीचं काही काम निघालं तर तो जे भाडं देतो त्यातून तो खर्च केला जातो.

तो म्हणतो की ऑफिसमधल्या कामापेक्षा तो कधीही रिक्षा चालवणं पसंद करेल. “एका ठिकाणी बसून काम करण्यापेक्षा हे असं खुल्या हवेतलं काम मला जास्त आवडतं.”

रिंकूचा दिवस सकाळी ७ वाजता सुरू होतो आणि दिवसभराचं काम संपवून तो न्यू गुप्ता कॉलनीजवळ असलेल्या आपल्या खोलीत थेट रात्री ९ वाजता परत येतो. घरी आलं की मग आपली पत्नी नज़्मुन्निसा आणि एक वर्षांचा छोकरा अनासशी फोनवर बोलायचं. “महामारीत आम्ही कसे बसे तगून राहिलोय,” तो म्हणतो. २०२० साली कोविड-१९ मुळे लावलेल्या टाळेबंदीच्या काळाबद्दल तो सांगतो.

२०२० साली पहिल्या आणि दुसऱ्या टाळेबंदीत दिल्लीच्या रस्त्यावर कुठलीच प्रवासी वाहतूक करायला परवानगी नव्हती. तेव्हा रिंकू गावी फतेहपूरलाच राहिला. तिथे तो शेतात काम कर कुठे रेशन नेऊन दे अशी छोटी-मोठी कामं करायचा. “आमच्या घराच्या पाठीमागे थोडी जमीन आहे. तिथे आम्ही मुळा आणि कोबी लावतो,” तो सांगतो. तेवढ्या कमाईवर त्यांचं अगदी कसंबसं भागत होतं. कामासाठी दिल्लीला परतल्यानंतर तो थेट २०२२ च्या जानेवारी महिन्यात गावी परत गेला. तेव्हा त्याने आपल्या बाळाला पहिल्यांदा पाहिलं. तीन महिन्यांचा झाला होता तो. बायको आणि मुलाला दिल्लीला आणणं सध्या तरी शक्यच नाहीये. “भाडं फार जास्त आहे.”

त्याला शाळा मध्येच सोडावी लागली पण त्याला शिक्षण पूर्ण करावं अशी फार इच्छा आहे. अनासचं आयुष्य वेगळं असावं असं त्याला मनापासून वाटतं. त्याच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचे म्हणून तर तो घर सोडून परगावी काम करतोय.

“सगळं ठीकठाक असतं तर मी इथे [दिल्लीत] आलोच नसतो ना,” तो म्हणतो.

पारी होमपेजवर जाण्याासाठी इथे क्लिक करा.

Editor's note

पलकिन लोहिया दिल्लीच्या रामजस कॉलेजमध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवीचं शिक्षण घेत आहे. ती म्हणते, “पारी एज्युकेशनसोबत इंटर्नशिप करत असताना मला माझ्या कक्षांच्या पलिकडे जावं लागलं. स्थलांतरित कामगारांचा संघर्ष आणि त्यांचा दृष्टीकोन मला समजला. मुख्यधारेतल्या माध्यमांमध्ये त्यांची ही बाजू कधीच दाखवली जात नाही.”

अनुवादः मेधा काळे

पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवाद आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.