
या लेखाचं वार्तांकन आणि लेखन मुळात ओडिया भाषेत केलं गेलं आहे. पारी एज्युकेशन भारतभरातल्या विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांसोबत त्यांच्या पसंतीच्या भाषेत वार्तांकन, लेखन आणि चित्रांवर काम करतं.
कोडोकोलाच्या बाजारात पक्ष्यांच्या झुंजीत ‘जिंकणारा मालामाल’ होतो.
राजू मुंडाने आपला कोंबडा झुंजीत उतरवण्यासाठी ५०० रुपये दिले आहेत. झुंजीत त्याचा कोंबडा जिंकला तर त्याला त्याचे पैसे तर परत मिळतीलच पण हरलेला पक्षी देखील त्याचा होणार. त्याच्याकडे मोठे कोंबडे असते तर त्याला झुंज लावण्यासाठी २,००० रुपये भरावे लागले असते आणि झुंज जिंकल्यावर मोठा पक्षी जिंकता आला असता.
केंदुझर (केंउझर असंही लिहिलं जातं) जिल्ह्याच्या बन्सपाल तालुक्यातल्या या बाजारात कोंबड्यांची चांगलीच चलती आहे. या तालुक्यातली निम्मी लोकसंख्या भुइया, मुंडा आणि जुआंग आदिवासींची आहे. इथले जाणते लोक आम्हाला सांगतात की हा बाजार १९६० किंवा त्याच्याही आधीपासून सुरू आहे.
कोंबड्यांच्या झुंजी शक्यतो ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात लावल्या जातात. याच वेळी शेतीची कामं जोरात सुरू असतात. जुलैत पेरलेला भात काढायला आलेला असतो तसंच मूग, उडीद (इथे याला बिरी म्हणतात) आणि तूरही (स्थानिकांच्या भाषेत हरद). जिल्ह्याची लोकसंख्या १,०२,५२७ (जनगणना, २०११) असून जवळपास सगळे जण शेतमजूर आणि शेतकरी आहेत.
दर शुक्रवारी पहाटे भरणारा हा बाजार संध्याकाळी सूर्य मावळल्यावर उठतो. आम्ही चार विद्यार्थी वेजीडिही गावाच्या आसपासच्या पाड्यांवर राहतो आणि आमच्या शिक्षिका दीप्तीरेखा पात्रा यांच्यासोबत आठवडी बाजारात काय काय होतंय ते लिहून घ्यायला आलोय. २०२१ सालच्या झुंजी आता सुरू व्हायला लागल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने गेली काही वर्षं या झुंजी बंद होत्या. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० या कायद्याच्या प्रकरण ३, कलम ११ (ड), (दोन) आणि (ढ) नुसार … ‘कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्राण्याशी झुंज देण्याकरिता चिथावणी दिल्यास’ हा गुन्हा मानण्यात येतो आणि त्याला रु. १० ते रु. १०० इतका दंड होऊ शकतो.
आपण ओळखले जाऊ या भीतीने कुणीच आम्हाला फोटो काढू देत नाही. आणि लोक झुंजी पाहण्यात इतके गुंग होते की आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला किंवा आमच्याकडे पहायलासुद्धा त्यांना वेळ नव्हता.



डावीकडेः स्पर्धकांची तयारी सुरू आहे. कोडोकालाच्या बाजारात झुंज सुरू आहे (मध्यभागी). फोटोः पबित्र बेहेरा. उजवीकडेः दोन मित्र कोंबड्यांच्या झुंजींची तयारी करतायत. फोटोः अंकित बेहेरा
तोलोकोडाकाल पंचायतीत येणारा कोडोकाला बाजार सुप्रसिद्ध खंडधार धबधब्यापासून फक्त २६ किलोमीटर अंतरावर आहे. बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी लोक ३० किलोमीटर प्रवास करून येतात. याच तालुक्यातल्या नयाकोटे आणि सिंघपूरहून आणि केंउझर सदर तालुक्यातल्या कालंदाहून.
५८ वर्षांच्या वसंता नायक मसाले विकायला आल्या आहेत. त्यांच्या लहानपणी हा बाजार कसा होता ते त्या सांगतात. “पूर्वी, फार कमी लोक इथे यायचे. आम्ही घरच्यासाठी लागणारी हाताने बनवलेली बांबूची भांडी, उडीद आणि मोहरी विकत घ्यायचो. जेवण सोबत बांधून आणलेलं असायचं कारण तेव्हा इथे खायला काहीच मिळायचं नाही. यायला जायला वाहनं नव्हती. त्यामुळे लोक एकत्र चालत यायचे आणि [बाजार संपल्यावर] रात्री अंधारात जंगलातून परत जाणं शक्यतो टाळायचे. त्या ऐवजी ते इथेच कुण्या तरी नातेवाइकाच्या घरी मुक्काम करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या गावी परतायचे.”
कोंबड्यांच्या झुंजी पहायला लोक बाजारात चांगलीच गर्दी करतात आणि इथली गर्दीही तेच सांगतीये. मोठाली जागा साफ करून बांबूच्या आडकाठ्या लावल्या जातात. या गोल जागेत झुंजी लागतात. बाजार भरतो त्या दिवशी तीस तरी झुंजी होतात. जे लोक मैदान तयार करायला मदत करतात त्यांना प्रत्येक झुंजीमागे १००-२०० रुपये मिळू शकतात.
लोक आठवड्याचं सामान खरेदी करून झुंजी बघत उभे असतात. धान्य, भांडीकुंडी, मीठमसाला, भाजीपाला, कोंबड्या, बकरी, मच्छी तसंच मध, आवळा, साल का रस (सालवृक्षाचा रस), बांबूची भांडी आणि इतर वस्तू असं सगळं वनोपज त्यांनी खरेदी केलेलं असतं. तुम्ही तुमची सायकल दुरुस्त करून घेऊ शकता. आइस्क्रीम, भेळभत्ता, समोसे आणि इतर पदार्थ खाऊ शकता.


कोविडच्या टाळेबंदीच्या काळात रस्त्यावर दुचाकी वाहनं दिसत होती पण सायकलस्वार मात्र गायब होते. आणि त्याचा फटका सायकल दुरुस्ती करणाऱ्या सुकुरु गिरी यांना बसला. ५८ वर्षीय गिरी गेली ३० वर्षं सायकली दुरुस्त करतायत. केंदुझर सदर तालुक्यातल्या नरसिंगपूरचे रहिवासी असलेले गिरी सांगतात की बाजाराच्या दिवशी त्यांची कमाई अगदी ५ रुपयांपासून ते १०० रुपये इतकी असू शकते. “मी काही कधी शाळेत गेलो नाही. सायकल दुरुस्त करण्याची कला मी माझ्या चुलत्यांकडून शिकलो. मी दुचाकी गाड्यांचं पंक्चरसुद्धा काढून देतो.”
धुबुली बेहेरा, वय ६४ इथून १५ किलोमीटरवर असणाऱ्या कुसोकालाच्या रहिवासी आहेत. त्या त्यांच्या एकरभर जमिनीत पावसाच्या पाण्यावर घरच्यापुरता तांदूळ करतात. त्या गेल्या सहा वर्षांपासून बांगड्या विकण्याचा व्यवसाय करतायत आणि बाजाराच्या दिवशी सरासरी ३०० ते ४०० रुपये कमवतात. “पूर्वी मी हांडिया [मोहाच्या फुलांची दारू] विकायचे. पण आमच्या गावातल्या बचत गटाच्या एका बैठकीत त्यांनी मला दारूऐवजी बांगड्या विकण्याचा सल्ला दिला. आता माझी कमाई घटलीये पण माझ्या समाजात मान मात्र वाढलाय,” त्या सांगतात. एक डझन बांगडी ३० रुपयांना मिळते.


सालवृक्षाच्या (Shorea robusta) रसाला रोशो म्हणतात. इथून पाच किलोमीटरवरच्या सुंदुरा पाड्यावरनं हा रोशो विकण्यासाठी रमणी देहुरी चालत बाजारात आल्या आहेत. “पूर्वी झाडं भरपूर होती त्यामुळे झाडाचा चीक सहज मिळायचा. तो काढून पूजेत वापरला जाणारा रश तयार करता यायचा. पण आता जंगलात फार झाडं तोडली जातायत त्यामुळे झाडाचा चीक सहज मिळत नाही. मी जंगलातून बांबू देखील आणते आणि त्यापासून भांडी आणि बरण्या तयार करते. बाजारात मला ७००-०० रुपयांची कमाई होत असेल,” त्या सांगतात.
आम्ही धर्मू बेहेरांना भेटलो. ते आम्हाला म्हणाले, “चार घास कमी खा, पण तुमच्या पोराबाळांना शिकवा.” आता ५२ वर्षं वय असलेल्या बेहेरांना शाळा सोडावी लागली होती कारण त्यांच्या आईवडलांना शाळेचा खर्च परवडत नव्हता. मग ते मातीची भांडी घडवायला शिकले. त्यांच्या वडलांकडे कुंभाराचं चाक होतं. आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन दुसरा काही तरी व्यवसाय करावा अशी त्यांची इच्छा आहे.
ते वेजीडिहीहून पाच किलोमीटर चालत इथे येतात. “मी खांद्यावर कावड करून माझी मडकी घेऊन येतो. गाडीत टाकली तर फुटून जायची,” आमच्या प्रश्नाला त्यांचं उत्तर.
“पूर्वी लोक पाणी थंड करण्यासाठी माठ वापरायचे. पण आता मागणी कमी होत चाललीये. त्यामुळे मला आठवड्याला जास्तीत जास्त १,००० ते १,२०० रुपयेच मिळू शकतात,” ते सांगतात. धर्मू मौसा या परिसरातल्या ३२ आठवडी बाजारांना जातात. केंदुझर सदर तालुक्यातलं नरसिंगपूर, बन्सपाल तालुक्यातलं सुदंगा अशा बाजारांमध्ये जाऊन ते आपली मडकी विकतात. लहानपणी आपल्या वडलांबरोबर मडकी विकायला जायचे त्याच्या आठवणी अजून त्यांच्या मनात ताज्या आहेत.


बन्सपाल तालुक्याच्या कुसोकाला गावातल्या ५५ वर्षीय यामिनी गिरींच्या दुकानात सगळं काही आहे – मसाले, बटाटा, कांदा, लसूण, सुकट वगैरे. त्या गेल्या २० वर्षांहून अधिक काळ या बाजारात येतायत. दहा किलोमीटरच्या गाडीभाड्याचे त्यांना ३०० रुपये द्यावे लागतात. “लग्न झाल्यावर १० वर्षांनी माझा नवरा वारला. त्यानंतर हातातोंडाची गाठ होती – दिवसाला दोन घाससुद्धा धड मिळत नव्हते,” बाजारात दुकान का टाकलं ते यामिनी मावशी सांगतात.




हा लेख लिहिणारे विद्यार्थी (समावेशक आणि उपयोगी शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या) अस्पायर सामाजिक संस्थेच्या शैक्षणिक वृद्धी कार्यक्रमामध्ये आणि टाटा स्टील फौंडेशनच्या थाउजंड स्कूल प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत. आपल्या भवतालाविषयी जाणून घेण्यासाठी आखलेल्या उपक्रमाअंतर्गत त्यांनी हा लेख लिहिला आहे.
या लेखासाठी मोलाची मदत केल्याबद्दल सुदीपा सेनापती, दीप्तिरेखा पात्रा आणि स्मिता अगरवाल यांचे पारी एज्युकेशनच्या वतीने मनापासून आभार.
Editor's note
पबित्र बेहेरा, लिजा बेहेरा, अंकित बेहेरा आणि शंकर बेहेरा कोडोकाला गावातल्या वेजीडिही माध्यमिक शाळेचे इयत्ता चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी आहेत.
अंकित म्हणतोः “मी कपडे खरेदी करण्यासाठी या बाजारात आधीही येऊन गेलोय पण या वेळी माझ्या शाळेतल्या बाईंबरोबर गेलो आणि मला अनेक गोष्टी नव्याने पहायला मिळाल्या, कोंबड्यांची झुंज, वगैरे. बाजारात दुकान टाकणाऱ्यांशी मला बोलता आलं आणि त्यांच्या अडचणी समजून घेता आल्या.”
सन्विती अय्यर पारी एज्युकेशनसोबत इंटर्न म्हणून काम करते आणि हा लेख लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत तिने जवळून काम केलं आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये तिचा स्वतःचा लेख How lockdowns impact a raddiwalla पारी एज्युकेशनवर प्रकाशित झाला होता. तो अवश्य वाचा.
अनुवादः मेधा काळे
पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवाद आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.