
मी एक इस्त्रीवाला म्हणून काम करतो. कानपूर विद्यापीठातून मी कला शाखेची पदवी घेतलीये. मी हे काम करीन असं काही मला वाटलं नव्हतं. मला शिकायची आवड होती म्हणून मी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. वाटलं होतं, काही तरी काम मिळेल. बीए झाल्यानंतर मी अनेक ठिकाणी अर्ज केले, गावातल्या बँकेत मॅनेजर, लेखपाल आणि रेल्वेमध्ये सुद्धा. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की पदवी मिळाली म्हणजे नोकरी मिळालीच असं नाही. त्यासाठी तुमच्याकडे पैसा पाहिजे आणि वशिला.
माझं नाव आहे फकीरे लाल कनौजिया. माझं वय ५५ वर्षं आहे. हरदोई जिल्ह्याच्या सांदी तालुक्यात बिलग्राम तहसिलातल्या बघियारी या गावी माझा जन्म झाला. आमचं गाव कानपूरपासून १०० किलोमीटर आणि दिल्लीपासून ४०० किलोमीटरवर आहे.
मी कानपूरला शिकत होतो तेव्हा मी आणि माझे मित्र कॉलेजला जाण्यासाठी १५ किलोमीटर प्रवास करून जायचो. कधी चालत तर कधी सायकलवर. मला माझ्या मित्रांबरोबर वेळ घालवायला आवडायचं. जाता येता आमच्या गप्पाटप्पा चालायच्या आणि प्रवास कधी संपायचा ते कळायचंही नाही. मी कॉलेजमध्ये भूगोल, अर्थशास्त्र, नागरिक शास्त्र, संस्कृत आणि हिंदी असे विषय घेतले होते आणि हे सगळे विषय मला आवडायचे. अच्छा लगता है की आप भी शिक्षा ग्रहण करते हो, ते म्हणतात.
पदवीचं शिक्षण घेतल्यानंतरही मला कानपूरमध्ये नोकरी मिळाली नाही, त्यामुळे मी माझ्या भावाबरोबर दिल्लीला आलो. १९८८ सालापासून मी इथेच आहे. मी पोटापाण्यासाठी इस्त्री करतो आणि त्यात मी समाधानी आहे. इथे जी मोकळीक मिळते, ती मला आवडते. मी इंडिया गेट पाहून आलोय आणि रेल्वेचं म्युझियम सुद्धा पाहून आलोय.
मी सुरुवातीला इथे आलो तेव्हा माझ्या काकांबरोबर दक्षिण दिल्लीत राहिलो. ते इस्त्रीवाले होते आणि मी सध्या जिथे काम करतोय, तिथेच म्हणजे साउथ दिल्लीच्या एका हाउसिंग कॉलनीत काम करायचे. १९९१ साली माझ्या मुलीचा, रुबीचा जन्म झाला आणि त्यानंतर मी आणि माझी पत्नी गुड्डी त्यांच्या घरातून एका झोपडपट्टीत रहायला आलो. आम्ही १२ वर्षं तिथे राहिलो. पण त्यानंतर साउथ दिल्लीतल्या जसोलापाशी असलेल्या आमच्या झोपड्या पाडून टाकल्या. त्यानंतर आम्ही तिथून मिठापूरला आलो. माझ्या कामाच्या ठिकाणापासून ही वस्ती १० किलोमीटरवर होती.



ही महामारी सुरू व्हायच्या आधीदेखील इस्त्रीच्या पैशात घर चालवणं तसं अवघडच झालं होतं. मी थोडे जास्तीचे पैसे मिळावे म्हणून गाड्या धुवायला सुरुवात केली. पहिला लॉकडाउन लागला त्यानंतर जवळपास दोन महिने मला घरातून बाहेरच पडता आलं नाही आणि त्यामुळे मला नियमितपणे इस्त्रीचं काम देणाऱ्या १३ घरी मी जाऊच शकलो नाही. दर महिन्याला आम्हाला १६ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ असं रेशन मिळत होतं, ते आणायला मी घराबाहेर पडायचो तेवढंच.
आता या वयात तसंही मी बाकी फारसं काही काम करू शकत नाही. पण घर चालवायला पैसा तर लागतोच ना. लॉकडाउन उठल्यानंतरही माझ्या नेहमीच्या कामांपैकी निम्मे लोकच परत आले. आता दुसऱ्या लाटेमध्ये मी ज्यांचे कपडे इस्त्री करतो त्या लोकांच्या सोसायटीत मला येऊ देतायत. त्यामुळे जरा बरंय. तिकडे सोसायटीत जायला मला सायकलवर एक तास लागतो.



मी कोळशाची इस्त्री वापरतो. मी जेव्हा कामाला सुरुवात केली [१९९१ मध्ये] तेव्हा कोळसा २ रुपये किलो होता. आता त्याचा भाव ४० रुपये किलो झालाय. पण इस्त्रीचा रेट होता तेवढाच आहे. सध्या एका कपड्याचे पाच रुपये मिळतात आणि आधी [दहा वर्षांपूर्वी] चार रुपये मिळायचे. माझ्या कमाईत खरं तर काहीच वाढ झालेली नाहीये. पण त्या पैशातून मी हे राहतं घर [मिठापूर] विकत घेऊ शकलोय.

दिवसभर तापलेल्या इस्त्रीने काम करून मला खूप घाम येतो. आणि कोळसा जसजसा जळत जातो, तसं इस्त्रीची उष्णता अंगावर येते. गेली ३३ वर्षं मी हे काम करतोय आणि मी सांगतो दिल्लीच्या उन्हाळ्यात दिवसेंदिवस उकाडा जास्तच वाढायला लागलाय. कधी कधी तर उन्हाळा असह्य होतो. मी खूप पाणी पितो तरी तहान जात नाही. माझी पत्नी गुड्डी अशा वेळी मदतीला येते आणि मी थकलो की तीच इस्त्री करते. इस्त्री झालेले कपडे घरोघरी देऊनसुद्धा येते.
आमचा मुलगा विनय १९ वर्षांचा आहे आणि दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून बीए करतोय. त्याने इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि हिंदी असे विषय घेतेलेत. लॉकडाउनच्या आधी तो नेहमी मला मदत करायचा आणि आतासुद्धा कपडे देऊन यायचे असले तर तो मदतीला येतो.

माझ्या गावात माझ्या मालकीची चार बिघा (सुमारे २ एकर) जमीन आहे. तीन वर्षांपूर्वी मी माझे चुलते, देसराज यांच्यासोबत करार केलाय. आता ते शेत करतायत आणि मला निम्मा हिस्सा देतात. आमच्या शेतापासून अर्ध्या किलोमीटरवर जंगल आहे आणि तिथे बोरी-बाभळी, कडुनिंब वगैरे हरतऱ्हेची झाडं आहेत. गायी आणि जंगलातली वानरं आमच्या शेतात नुसता धुडगुस घालत असतात. तिथे माणसांपेक्षा माकडंच जास्त आहेत. त्यामुळे जनावरं हाकलून लावण्यासाठी लोकांना रात्रभर जागलीवर रहावं लागतं.
मी लहान होतो ना तेव्हा आम्ही गहू, बाजरी, ज्वारी, मका आणि भुईमूग अशी बरीच पिकं घ्यायचो आणि त्याला पैसाही बरा मिळायचा. आज एका बिघ्यात गहू पेरायचा तर मला ५,००० रुपये खर्च येतो. सध्या आम्ही फक्त गहू लावतोय. त्यातनं जवळपास २ क्विंटल धान्य हातात येतं. घरी खायला आणि थोडा विकण्याइतका माल होतो.
शेती करणं फार अवघड होत चाललं आहे. जे शेती करतात ना त्यांनाच त्यांच्या जमिनीसाठी चांगलं काय आहे ते समजतं. हे नवीन तीन कृषी कायदे आणलेत ते फक्त राजकारण्यांच्या भल्यासाठी आणलेत. शेतकऱ्यांना त्याच्यात काहीही फायदा दिसत नाहीये. म्हणून ते त्यांच्या हक्कांसाठी लढतायत.
अनुवादः मेधा काळे
Editor's note
रोहन चोप्रा अशोका युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्र विषयाचं शिक्षण घेत आहे. २०२१ साली उन्हाळ्यात त्याने पारीसोबत काम केलं. आपल्या परिसरात नित्याच्या सेवा सुविधा देणाऱ्या लोकांचं आयुष्य कसं असतं हे खोलात जाऊन जाणून घ्यायची त्याची इच्छा होती आणि म्हणून त्याने ही कहाणी लिहायचं ठरवलं. तो म्हणतो, “मी रोज ज्यांना भेटतो, ज्यांना पाहतो त्यांच्या आयुष्याबद्दल मात्र मला फारसं काही माहित नाही. पारीसोबत काम करत असताना मला त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. आता कनौजियाजींशी माझी गट्टी जमली आहे. मी जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यांना भेटून येतो. ते माझ्याशी खूप वेळ बोलतात. आसपासचा निसर्ग आणि आपलं आयुष्य अशा अनेक विषयांवर ते काय काय बोलतात. अनवाणी पायांनी गवतावर चालण्याची मजा त्यांनीच मला शिकवली.”
पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवादक आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.