अजिताला एखादी टोपली विणायसाठी काय लागतं, तर फक्त एक काथी (सुरी). बांबूच्या काही पट्ट्या एकमेकांना काटकोनात ठेवून ती काम सुरु करते आणि त्या सर्वांच्या मधून एक पट्टी ओवून घेते. या पट्टीतून इतर पट्ट्या ओवत ओवत जी वस्तू करायची तिच्या व्यासाइतकं वर्तुळ विणून घेते.

“ही कला मी वयाच्या सोळाव्या वर्षी शिकायला लागले,” अजिता सांगते. वडिलांची शेतमजुरीतून होणारी कमाई कुटुंबाला पुरेशी नसल्यामुळे तिला दहावी नंतर शाळा सोडावी लागली. त्रिसुर जिल्ह्याच्या चालाकुडी तालुक्याच्या कुट्टीचिरा खेड्यात ती राहते.

अजिता वय ४८,हिला एखादी टोपली विणायची असेल तर काय लागतं , तर फक्त एक काथी (सुरी). फोटोग्राफर : डॉन फिलिप

सध्या अजिता तिच्या नवऱ्याची थोडी मदत घेऊन बांबूंच्या अनेक वस्तू तयार करते. या वस्तू म्हणजे – दिव्याची शेड, पेन स्टॅन्ड, काचेच्या Ωबाटल्यांवर केलेले बांबूचे विणकाम आणि त्यात ठेवलेली बांबूंची फुलं. शिवाय वेगवेगळ्या आकाराच्या आणि मापांच्या टोपल्या आणि पंखे.

अजिता वर्णन करते, “ एक टोपली (बास्केट) विणून पूर्ण करायला एक ते दीड दिवस लागतो. पहिल्या दिवशी टोपली विणली जाते आणि दुसरा अर्धा दिवस त्याला आलेली बांबूची तुसं काढून ती गुळगुळीत करण्यात जातो – बाहेर आलेली तुसं जितकी साफ कराल तितकी ती वस्तू जास्त चकचकीत दिसते.” दिव्याची एक शेड करायला साधारण दोन दिवस लागतात. तर एका दिवसात आठ ते दहा फुलं किंवा पाच पेन स्टॅन्ड तयार होतात. काचेच्या बाटलीच्या भोवती बांबूनं विणणं हे काम जरा किचकट आहे आणि त्याला दोन दिवस लागतात.

तिनं केलेल्या कलाकुसरीच्या अनेक वस्तू तिच्या भोवती पसरल्या आहेत आणि त्यांच्यावर थोडी चकाकी पण दिसत आहे. “बांबूला एक अंगची चकाकी असतेच. तो जितका वाळलेला असतो तितका चमकदार दिसतो. या वस्तूंना ती कधीकधीच व्हार्निश लावते कारण त्यानं बांबूचं पुढे नुकसान होतं असं तिला वाटतं .

तिच्या घराजवळच्या परिसरात दहा किलोमीटरवर असलेल्या चालाकुडीमधल्या बांबू कोर्पोरेशन डेपोमधे बांबूचा साठा असतो. महिन्यातून एकदा तिला बांबू आणावा लागतो. कधी ती स्वतः जाऊन तो आणते तर कधी त्यांचे लोक येताजाता तिच्या दारात बांबू उतरवतात. साधारण दहा मीटर लांबीच्या एका बांबूला ३० रुपये लागतात. महिनाभरात ती असे जवळजवळ १०० बांबू विकत घेते. डेपोमधून आलेले लोक घराजवळच्या साठवणीच्या शेडमधे बांबू नेऊन ठेवतात, कारण ते पावसापासून जपावे लागतात.

२०१५ साली अजिताने तिची श्रीदीपम हॅन्डीकॅरॅफ्ट्स ही कंपनी रजिस्टर केली. तिची बांबूची उत्पादनं लोकांकडे पोहोचवण्याचं काम तिचा नवरा किंवा स्कुटर मेकॅनिक असलेला तिचा मुलगा करतो. अजिताची मुलगी दुसरीकडे नोकरी करते पण शक्य असेल तेव्हा ती आईला मदत करते.

“करोनाची महामारी सुरु झाली आणि बांबू उद्योगाला मोठाच फटका बसला. बांबूच्या वस्तू मुख्यतः प्रदर्शनं, समारंभांचं आयोजन करणारे आणि रेस्टॉरंटसमध्ये लागत असत. आणि त्यातून अजिताचं मुख्य उत्पन्न येत होतं असं ती सांगते. मनोरमा फिएस्टा आणि बांबू मिशनतर्फे आयोजित केलं जाणारं वार्षिक बांबू फेस्टिव्हल या प्रदर्शनांमधून राज्यभरात वस्तू विकल्या जात असत. २०२० मधल्या लॉकडाऊनमुळे ही प्रदर्शनं भरणंसुद्धा बंद झालं. अजिता सांगते की महामारी येण्याच्या आधी तिला महिना ३०,००० ते ३५,००० रुपये कमाई होत होती. आता त्याच्या वीस ते तीस टक्के कमी रक्कम मिळत असल्याचं ती सांगते.

(कोविड नंतर) ई-प्लॅटफॉर्म वरून विक्री सुरु झाली आहे. पण तिच्या वस्तू हाताळण्यात ते पुरेशी काळजी घेतील असं अजिताला वाटत नाही. ती म्हणते. “माझ्या वस्तू फारच पातळ आणि नाजुक असतात.” बोलता बोलता बांबूची एक काडी ती हातानं वाकवून दाखवते. “बांबूची वस्तू तळापाशी घट्ट विणली की तिची मजबुती बरीच वाढते. तरीही चुकीच्या पद्धतीनं हाताळली गेली तर तिचा आकार बिघडू शकतो.” अजिता स्पष्ट करते. “माझ्याकडे तेवढं भांडवलही नाही किंवा मोठ्या संस्थेचा पाठिंबाही नाही. एखादी वस्तू तुटली तर मला होणारं नुकसान बरंच मोठं असतं. त्यामुळे माझी वस्तू मोडली जाणं मला परवडत नाही.”

बांबूपासून तिनं केलेल्या अनेक दिव्यांच्या शेड आणि टोपल्यांकडे पहात ती सांगते, “हे काम करताना मी कधी असा विचार करत नाही की, दुसरीकडे कुठे काम करून मला जास्त पैसे मिळतील. या कामाशी माझी जी बांधिलकी आहे आणि त्यातून जे समाधान मिळतं त्यासाठी मी ते करते.”

लाईव्हज अंडर लॉकडाऊन या शृंखलेतली ही एक गोष्ट आहे. सेंट झेवियर्स कॉलेज (स्वायत्त), मुंबई येथील प्राध्यापक अक्षरा पाठक- जाधव आणि पेरी सुब्रमण्यम यांनी या न्यूज स्टोरीसाठी मोलाचं सहकार्य केलं त्यासाठी पारी एज्युकेशनची टीम त्यांची आभारी आहे.

Editor's note

डॉन फिलिप हा सेंट झेवियर्स कॉलेज (स्वायत्त), मुंबई मधे पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. पारी एज्युकेशनच्या लाईव्हज अंडर लॉकडाऊन या शृंखलेत त्याच्या कॉलेजच्या सहकार्यानं त्यानं लॉकडाऊनचा केरळातल्या बांबू कारागिरांवर काय परिणाम झाला याचा अभ्यास केला. तो म्हणतो, “पारी एज्युकेशनच्या प्रोजेक्टमुळे मला स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या परिस्थितीची समज आली. महामारीच्या काळात या उद्योगातल्या लोकांना कशा अडचणींचा सामना करायला लागला ते कळलं. मी अजिताची स्टोरी लेखी नोंदवल्यामुळे पत्रकार त्यांचं किचकट काम कसे कार्यक्षमतेनं पार पाडतात हे मला चांगलंच समजलं.  

अनुवादः सोनिया वीरकर