रात्री दिवे मालवण्याआधी सती मणी एकदा सगळ्या गोष्टींवर नजर टाकतात. त्यांची सगळी महत्त्वाची कागदपत्रं आणि ठेवणीतले कपडे प्लास्टिकमध्ये गुंडाळून खुंटीवर अडकवलेत. स्वयंपाकाची भांडी जमिनीपासून दोन फुटावर सिमेंटच्या कट्ट्यावर ठेवलीयेत.

“मी किती तरी वेळा मध्यरात्री २ वाजता उठलीये आणि घरात पुराचं पाणी शिरलेलं पाहावं लागलंय. धुतल्यानंतरही काळे डाग आणि दर्प जात नाही म्हणून मी आजवर किती उश्या आणि पलंगपोस फेकून दिलेत त्यांची तर गणतीच नाही,” ६५ वर्षांच्या सती सांगतात. केरळच्या कोचीमध्ये थेवर-पेरांदूर (टीपी) कालव्याच्या काठावर असलेल्या गांधीनगरमधल्या पी अँड टी कॉलनीच्या त्या रहिवासी आहेत.

टीपी कालवा कोचीच्या उत्तरेला असलेल्या पेरांदून पुळापासून दक्षिणेकडच्या थेवरच्या दिशेने वाहतो. एकूण ९.८४ किलोमीटर अंतर वाहत हा कालवा शहराच्या बॅकवॉटरमध्ये जाऊन मिळतो. कोचीमधून वाहणाऱ्या सहा जलमार्गांपैकी हा एक. एडप्पली कालवा, चिलवन्नूर कालवा, थेवर आणि मार्केट कालवा हे इतर काही. एर्णाकुलमच्या आसपासची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या मार्गांचा वापर वाढावा यासाठी आता राज्य शासन प्रयत्नशील आहे.

गेल्या तीस वर्षांत कोची शहराची लोकसंख्या दुप्पट होऊन २१ लाख इतकी झाली आहे आणि हा जास्तीत जास्त मीटरभर खोल टीपी कालवा आता नाला-गटार होऊ गेला आहे. मेट्रोच्या कामामुळे दोन ठिकाणी त्याचा प्रवाह थांबलाय आणि झरे देखील बंद झालेत. कालव्याच्या काठावर असलेली रुग्णालयं, स्थानिक बाजार, उद्योग आणि घरातला सगळा कचरा थेट या कालव्यात येऊन पडतो. एकूण ६३२ नाल्या आणि २१६ रस्त्यावरच्या गटारांमधून वाहत येणारं प्रक्रिया न केलेलं सांडपाणी, कारखान्यातून बाहेर पडणारे घटक आणि पावसाळ्याचं पाणी थेट या कालव्यात वाहत येतं. सुका कचरा कालव्याच्या कडेला साचून राहिल्यामुळे काही ठिकाणी कालव्याची रुंदी केवळ आठ मीटर इतकी कमी झाली आहे.

पी अँड टी कॉलनीतल्या इतर अनेकांप्रमाणे सतींचं घर देखील कालव्याच्या बाजूला आहे – एर्णाकुलम जंक्शन रेल्वे स्थानकाच्या मागे. ही कॉलनी २५० मीटर पोराम्बोके (शासनाची वापराविना असलेली किंवा लोकोपयोगी कामासाठी राखीव जमीन) जमिनीवर वसलेली आहे. इथे राहणाऱ्यांचं म्हणणं आहे की भाड्याने घर घेण्यापेक्षा अशा पोरोम्बोके जमिनीवर घर बांधणं कधीही स्वस्तातला पर्याय होतं. हळूहळू आपल्या झोपड्यांच्या जागी काँक्रीट ब्लॉक आणि पत्रा टाकलेली घरं बांधली गेली. वीस वर्षांपूर्वी इथल्या स्थानिक चर्चने पत्रे दान केले होते.

“मी पहिल्यांदा इथे आले ना, तेव्हा पाणी नितळ होतं आणि आम्हाला अधून मधून चांगले मासे देखील मिळायचे. लोक कधी कधी ती मासळी विकायचे. आज, मासळीचं नाव नाही. आता फक्त या गटारांमधून सांडपाणी वाहत येतं,” सती सांगतात. आणि आपल्या घरामागच्या काळ्याशार पाण्याकडे बोट दाखवतात. कालव्याच्या काठावर असलेल्या सगळ्या घरांच्या स्वयंपाकघरातून आणि मोरीतून सगळं सांडपाणी थेट कालव्यात जातं. “मी या घाण पाण्यात गेले ना की दर वेळी माझ्या पायावर पुरळ उठतं,” त्या म्हणतात.

सती पूर्वी घरकामगार होत्या. “मी दोन घरात काम करायचे आणि महिन्याला ४,५०० रुपये पगार मिळायचा. कालव्यात पाणी भरलं की मी घरीच थांबायचे. त्या दिवशीचा खाडा व्हायचा. सगळा दिवस घरातली घाण काढण्यात जायचा. प्लास्टिकच्या चिंध्या, मैला, आसपासच्या बस डेपोतून आलेलं ग्रीस, सगळं पाण्यासोबत घरात वाहत यायचं,” त्या सांगतात. तेव्हा त्यांचे पती, के. एस. मणी, वय ६९ रोजंदारीवर कामं करायचे. देवाची यात्रा असली की ते इथून १६० किलोमीटरवर पथनमथिट्टा जिल्ह्यातल्या सबरीमाला मंदिराजवळ चहा आणि खाण्याची टपरी टाकायचे. तेवढ्या यात्रेच्या काळात – नोव्हेंबर ते फेब्रुवारी – त्यांना महिन्याला २०,००० रुपयांची कमाई व्हायची. एरवी रोजंदारी करून ३,००० रुपये हाती पडायचे.

गेली अनेक वर्षं मणी अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना मधुमेह आहे. काही वर्षांपूर्वी संसर्ग झाल्यानंतर त्यांचा डावा पाय खालून कापून टाकावा लागला होता. त्यांच्या दमा आणि मधुमेहाच्या उपचारावर या दोघांना महिन्याला २,००० रुपये खर्च करावे लागतात. “आम्ही दोघंही शासनाच्या १४०० रुपये महिना पेन्शनसाठी पात्र आहोत. पण गेली चार महिने मणींना त्यांचं पेन्शन मिळालेलं नाही. त्यांचा हात नीट चालत नाही आणि त्यांना त्यांचं नावच नीट लिहिता येत नाहीये,” त्या सांगतात. सतींचं पेन्शन त्यांच्या युनियन बँकेच्या खात्यात जमा होतं. त्यांची शाखा दोन किलोमीटरवर आहे.

सती मूळच्या कोचीच्या उत्तरेकडच्या पारावूरच्या. ४६ वर्षांपूर्वी त्यांचं आणि मणींचं लग्न झालं आणि त्या पी अँड टी कॉलनीत रहायल्या आल्या. इथेच राहण्याचा निर्णय का घेतला असं विचारताच सती म्हणतात, “इथून आम्हाला शहरात येणं-जाणं सोपं होतं. प्रवासावर खर्च करायला लागायचा नाही.”

मणींची बहीण, तुलसी कृष्णन, वय ६१ त्यांच्या शेजारीच राहतात. “आम्ही पहिल्यांदा इथे आलो ना, त्याला आता ५० वर्षं झाली. तेव्हा इथे अगदी एक-दोन घरं होती. आता इथे ८५ घरं आहेत आणि एकूण ८१ कुटुंबं वस्तीला आहेत,” त्या सांगतात. इतक्यात इथे निवडणुका झाल्या आहेत त्यामुळे तुलसींसारख्या इथल्या इतर रहिवाशांना देखील कॉलनी नीट माहित झालीये.

तुलसींना अस्थिक्षय – किंवा हाडं ठिसूळ होण्याचा आजार आहे आणि त्यामुळे त्या ताठ उभं राहू शकत नाहीत आणि चालू शकत नाहीत. “जेव्हा जोराचा पाऊस येतो, तेव्हा या पाण्यातून वाट काढत मेन रोडला [चढाकडे] जाणं मला अशक्य होतं. मग मी आणि माझे पती माझ्या मुलीच्या घरी रहायला जातो. पण त्यांच्या जवळ तरी किती दिवस राहणार?” त्या विचारतात. त्यांची मुलगी रेखा साजन इथून एक किलोमीटवर गांधी नगरमध्ये राहतात.

या कॉलनीची जमीन महानगरपालिकेच्या – बृहद कोचीन विकास प्राधिकरण (जीसीडीए) मालकीची आहे. इथल्या रहिवाशांच्या मते पी आणि टी म्हणजे पॉवर आणि टेलिकम्युनिकेशन. इथून केवळ ५० मीटरवर भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चा डेपो आहे.

अजिरा, वय ७२ त्यांच्या दिवंगत मुलीच्या आणि जावयाच्या घरात एकट्याच राहतात. त्यांचं रस्त्यापाशी किराणा मालाचं छोटंसं दुकान होतं. पण त्या सांगतात की शासनाने ते पाडून टाकलं. आता त्या घरातूनच काही वस्तू विकतात आणि दिवसाला त्यातून २०० रुपयांची कमाई करतात. “इथे अनेक लोक उधारीवर व्यवहार करतात त्यामुळे सगळं [लक्षात ठेवणं] अवघड आहे. माझा पाय अधू आहे आणि श्वासाचा त्रास, त्यामुळे बाहेर जाऊन जास्त सामान भरणं सुद्धा होत नाही,” त्या सांगतात.

केरळमध्ये पावसाळ्यामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे (जून ते सप्टेंबर) सरासरी १,९९७.४ मिमी पाऊस होतो. धुवाँधार पावसामुळे कोचीच्या नाल्यांमध्ये चिखल आणि प्लास्टिक अडकून नाल्या तुंबतात. रस्त्यात पाणी भरतं आणि ते अखेर कालव्यात शिरतं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे कालव्याला पूर येतो आणि त्यातलं घाण, काळं शार पाणी पी अँड टी कॉलनीतल्या लोकांच्या घरात शिरतं. भरतीच्या काळात कालव्याचं पाणी वाढायचं आणि त्यातलं सांडपाण्याचं प्रमाण जरा उतरायचं. पण आता काठावर बांधकामं वाढलीयेत. कमी उंचीचे पूल बांधल्यामुळे कालव्याची उंचीला अडथळा आलाय आणि पात्र अरुंद झालंय. त्यामुळे कालव्याच्या अनेक भागात समुद्राचं पाणी पोचतच नाही त्यामुळे त्याला डबक्याचं स्वरुप आलंय.

पाणी साचून राहिलेलं असल्यामुळे जलपर्णीसारख्या घातक वनस्पतींची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. डास आणि माश्यांची पैदासही वाढते. साप आणि उंदीर तर कायमच संडासच्या पाइपमधून घरात शिरतात. “उंदीर माझ्या स्टीलच्या कपाटात शिरतात आणि आतापर्यंत माझे किची तरी चांगले कपडे त्यांनी कुरतडून टाकलेत,” सती सांगतात.

केरळ जहाज वाहतूक आणि आंतरदेशीय जल वाहतूक महामंडळाने जानेवारी २०१७ मध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार या कालव्याच्या प्रवाहात ‘गाळ, कमी उंचीचे पूल, अतिक्रमणं आणि वस्त्यांचा’ अडथळा आहे. ‘कालव्याचं पात्र रुंद केलं तरच पाणी वाहतं होईल आणि जलमार्ग म्हणून त्याचा वापर करणं शक्य होईल’ असंही पुढे या अभ्यासात म्हटलं आहे.

सतीच्या शेजारी, मेरी विजयन यांना आठवतं की त्यांचे भाऊ कालव्यात पोहायचे. त्या आणि त्यांचे पती, विजयन के. गेली ३० वर्षं या वस्तीत राहतायत. विजयन रेल्वे स्टेशनवर हमाली करायचे. लग्न झाल्यावर कोचीहून ते इथे रहायला आले. “हा कालवा म्हणजे खरं तर पेरांदूर पुळाची शाखा आहे. लोक कपडे धुवायला, अंघोळीसाठी तिथे जायचे. पाणी इतकं नितळ असायचं की रुपयाचं नाणं खाली तळाला गेलं तरी स्वच्छ दिसायचं. आता तर कुणाचं शव पाण्यात असलं तरी दिसायचं नाही,” ६२ वर्षीय मेरी कडवटपणे म्हणतात.

आम्ही मेरींना भेटलो तेव्हा त्या घरी लॉटरीची काही तिकिटं मोजत होत्या. “मी रेल्वे जंक्शनपाशी ही तिकिटं विकून दिवसाला १००-२०० रुपये कमवत असे,” दारापाशी येत आमच्याशी बोलता बोलता त्या म्हणतात. पण महामारी सुरू झाली आणि आता तिकिटांची विक्री बेभरवशाची झाली आहे.

डावीकडेः ‘पाणी इतकं नितळ असायचं की रुपयाचं नाणं खाली तळाला गेलं तरी स्वच्छ दिसायचं. आता तर कुणाचं शव पाण्यात असलं तरी दिसायचं नाही,’ गेली ३० वर्षं वस्तीत राहणाऱ्या मेरी विजयन म्हणतात. उजवीकडेः इथल्या सगळ्याच रहिवाशांप्रमाणे आजिरा देखील घरात पाणी घुसण्याच्या भीतीने आपली शासकीय कागदपत्रं आणि इतर काही वस्तू प्लास्टिकमध्ये गुंडाळून भिंतीवर लटकवून ठेवतात. फोटोः आदर्श बी. प्रदीप

“सरकार गेली अनेक वर्षं इथल्या रहिवाशांचं कायमसाठी कोचीमध्ये मुदमवेली [इथून १० किलोमीटरवर] पुनर्वसन करण्याचं नियोजन करत आहे,” रोजंदारीवर काम करणारे अजित सुकुमारन सांगतात. “मी १० वर्षांचा पण नसेन, तेव्हापासून मी हे नियोजन ऐकतोच आहे. आता माझी स्वतःची दोन लेकरं झाली. काहीही हललेलं नाही.” अजित यांच्या पत्नी सौम्या घरकामगार आहेत. त्यांना महिन्याला ६,००० रुपये मिळतात आणि अजित दिवसाला ८०० रुपये कमवतात. पण त्यांना एका महिन्यात जास्तीत जास्त १५ दिवस काम मिळतं. ते दोघं अजितच्या आई-वडलांचं सगळं पाहतात. गीता, वय ५४ आणि वडील के. सुब्रमण्यम शेजारीच राहतात.

“३१ जुलै २०१८ रोजी नगरसेविका पूर्णिमा नारायण [२०१५-२०२० कालावधीसाठी गांधीनगर वॉर्डाच्या नगरसेविका] यांनी आमच्या सगळ्या घरांमधल्या एकेकाला बसमधून तिथे १० किलोमीटरवर मुंडमवेलीमध्ये न्यायचं ठरवलं. त्यांनी प्रवास भाडं म्हणून प्रत्येकाकडून १०० रुपये घेतले. तिथे भूमीपूजन झालं, [मुख्यमंत्री पिनयारी विजयन] यांच्या हस्ते कोनशिला बसली, त्यांनी वचन दिलं की १० महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल म्हणून,” सती सांगतात.

त्यालाही आता दोन वर्षांहून जास्त काळ लोटलाय आणि अधून मधून टाकलेली निवारा शिबिरं एवढीच काय ती मदत त्यांच्या वाट्याला आली आहे. २०१९ साली ८ ते १५ ऑगस्ट दरम्यान एर्णाकुलमला २३७५.९ मिमि पावसाने [२०३८ मिमि या सरासरीपेक्षा १७ टक्के जास्त] झोडपून काढलं. पावसामुळे टीपी कालव्याला पूर आला. “माझ्या शेजाऱ्यांना आणि मला मणींना खांद्यावरून निवारा शिबिरात न्यावं लागलं,” सती सांगतात. “काहीही हालचाल करणं मुश्किल होतं. [दूरसंचार निगमचं] मोठं कुंपण आणि आमच्या घराच्या मधल्या बोळातून दोन माणसं शेजारी चालू शकतील इतकीही जागा नव्हती.”

डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये १० महिन्यांमध्ये पुनर्वसन करण्याच्या वचनाला तिथल्या उमेदवारांनी पुन्हा उजाळा दिला. त्यानंतर जीसीडीएने मुंडमवेलीमध्ये ७० सेंट जमिनीवर ८८ घरं बांधण्याची योजना आखली. केरळ सरकारच्या लाइफ मिशन या अभियानाअंतर्गत ‘भूमीहीन’ आणि ‘ज्यांना घरं पूर्ण बांधणं शक्य नाही’ अशांसाठी घरं बांधली जातात. मात्र, या प्रकल्पासाठी साहित्य पुरवणाऱ्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आणि सगळंच थंड्या बस्त्यात गेलं. “आता नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आणि आम्ही सुरुवातीच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. केरळ सरकारच्या तांत्रिक समितीने हिरवा कंदील दाखवण्याची आम्ही वाट पाहतोय,” जीसीडीएचे अध्यक्ष व्ही. सलीम सांगतात.

वस्तीतले रहिवासी मात्र साशंक आहेत. “इथे आमच्याकडे कुणीही येत नाही. मुंडमवेलीची ती सफर आमच्या स्मृतीतून निसटून गेली तसेच इथले अधिकारी देखील,” तुलसी म्हणतात.

अनुवादः मेधा काळे

Editor's note

आदर्श बी. प्रदीप चेन्नई येथील एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममध्ये मुद्रण पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे. कोचीमध्ये आपल्या घरी राहत असताना तो एर्णाकुलम जंक्शला जाण्यासाठी कायम हा कालवा पार करून जात असे. तो म्हणतोः “गेल्या पावसाळ्यात मी पाहिलं की कालव्याचं काळंशार पाणी घरात शिरल्यावर इथले लोक थोडे चढाच्या दिशेने निघाले होते. मला जास्त जाणून घ्यायची इच्छा झाली. पारी एज्युकेशन सोबत काम करताना मला अनेक गोष्टी शिकता आल्याः शासकीय स्रोतांमधली विश्वासार्ह माहिती गोळा करण्यापासून ते अगदी बारीक बारीक तपशिलांकडे लक्ष देण्यापर्यंत. आणि त्यानंतर सुसंगत रित्या लेख लिहिणे. हा एक शिकवणारा अनुभव होता आणि शिवाय ज्यांच्याविषयी मी संशोधन करत होतो त्यांच्या जवळ जाण्याची संधी मला यातून मिळाली.”

पुणे स्थित मेधा काळे हिने स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात विविध समूहांबरोबर काम केले आहे. पारीमध्ये ती अनुवादक आणि मराठी अनुवाद संपादनाचं काम करते.