एक फळ. तीन रंग. तीन चवी: कडू, गोड आणि आंबट.

“या फळाचे गुलाबी, लाल आणि पिवळा असे रंग आहेत. गुलाबी रंगाचं मूटी पळम् कडू लागतं, लाल गोडसर असतं, आणि पिवळं आंबटगोड असतं,” केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील वण्णप्पुरम् येथील शेतकरी बेबी अब्राहम म्हणतात. “जे जास्त कडू आणि आंबट असतं त्यात सर्वाधिक औषधी गुणधर्म असतात. मधुमेह झालेल्या लोकांसाठी ते चांगलं असतं. आदिवासी ते पोटदुखी आणि घशाच्या आजारावर वापरतात.”

या फळाचं नाव मूटी (खाली) आणि पळम् (फळ) या दोन शब्दांवरून आलंय कारण हे फळ फांद्या आणि खोडावरही लागतं. चटकदार रंग जंगली प्राण्यांना आकर्षित करतात. बेबी म्हणतात की जंगलात झाडावर मूटी पळम् दिसतच नाही – अस्वल, माकडं, हत्ती, एवढंच काय तर कासवंसुद्धा ते खाऊन टाकतात.

६७ वर्षीय अब्राहम यांना ३६ वर्षांपूर्वी त्यांच्या भावाने दोन रोपटी भेट दिली होती. त्यांना ही पश्चिम घाटातील मुपान अर्थात एका आदिवासी म्होरक्याकडून मिळाली होती. आज त्यांच्याकडे २०० हून जास्त झाडं आणि रोपटी आहेत. पहिल्या जोडीची इतक्या जवळ लागवड केली होती की त्यांचं खोड एकजीव झालंय. अब्राहम म्हणतात की उत्तम पिकासाठी या झाडाचं बी दोन फूट खोल जमिनीत पाच मीटर अंतरावर पेरायला हवं. ते कुठल्याही ऋतूत पेरता येतं मात्र शक्यतो पावसाळ्यानंतर पेरणी करण्यात येते. “तीन चार वर्षांनी त्यांना फुलं येतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडाला ५० किलो पीक येतं अन् लहान झाडाला १५ किलो,” त्यांनी आम्हाला सांगितलं.

अब्राहम यांनी त्यांच्या एकरभर जमिनीवर रबर आणि इंडिगो, मूटी पळम्ची फळझाडं, कोकम, रामबुतान, लिंबू आणि आवळा, टॅपिओका, हळद आणि आरारोट यांसारखी कंद आणि जायफळासारखे मसाले इत्यादी नगदी पिकांची लागवड केलीय. “माझ्या घरचे, म्हणजे माझी बायको, आणि मुलगा जेरिन व मुलगी जेंटीना मला शेतीत मदत करतात,” ते म्हणतात. “आम्ही मजूर ठेवत नाही. पिकांसाठी शेड उभारण्यापासून ते दगडं काढण्यापर्यंत सगळी कामं आम्हीच करतो.”

मूटीच्या झाडांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे अब्राहम वर्षातून दोनदा, बहुतेक करून सप्टेंबर महिन्यात, जैविक खत वापरणं पसंत करतात. “आम्ही जास्त करून गायीचं शेण, गांडूळखत आणि कडलपिनाकू – भुईमुगाची पेंड वापरतो. मूटीच्या झाडांना फुलं येऊ लागली की त्यांना जास्त पाणी लागतं, म्हणून आम्ही उन्हाळ्यात त्यांना दिवसातून तीनदा पाणी देतो,” ते म्हणाले, आणि झाडांचा वटवाघुळापासून बचाव करण्यासाठी ते त्यांच्याभोवती जाळीदेखील लावतात.

त्यांच्या नर्सरीत अब्राहम रोपट्याची एक जोडी रू. २५०ला विकतात. मूटी पळम् (लॅटिन नाव: बॅक्कॉरिया कोर्टलेन्सिस) याला इतर स्थानिक नावांनीही ओळखतात: मूटी कायपान, मूटी पुली आणि मेरातका. तोडल्यावर मूटीचं फळ दोन महिने टिकतं, मात्र आतील गर आटत जातो. स्थानिक लोक या गराचं लोणचं घालतात, सालापासून मदिरा बनवतात आणि आदिवासी त्यात मध घालून तेन मूटी नावाचा मधुरस तयार करतात. 

“मूटीचं एक विशेष असं की परागीकरण होण्यासाठी नर रोपाच्या बाजूला एक मादी रोप असायला हवं. नाहीतर जे फळ लागतं त्याच्या आतमध्ये गर नसतो, नुसतीच करवंटी येते. हवा आणि लहान माशा परागीकरण करतात,” अब्राहम म्हणाले. साधारण चार वर्षांत नर झाडाला फुलं येतात आणि पाठोपाठ मादी झाडाला लाल फळांचे द्राक्षासारखे गुच्छ लागतात. जानेवारीच्या उत्तरार्धात फळं यायला सुरुवात होते आणि ते ऑगस्ट संपेपर्यंत चालू राहतं.

“[इतर उत्पादक] लोक मला बरेचदा म्हणतात की त्यांच्या फळांना नुसती करवंटी असते अन् आत अजिबात गर नाही. याचं कारण म्हणजे जवळपास एकही नर झाड नाही. झाड नर होणार की मादी हे मला बी पाहून कळतं.  एकदा त्याचं रोपटं झालं की मग फरक ओळखणं जड जातं,” अब्राहम म्हणाले. इतर उत्पादक बरेचदा त्यांचा सल्ला घेतात.

मूटी पळम्च्या झाडाच्या उंचीत फरक असतो. जंगलात आढळणारी पिवळी प्रजाती १० ते १५ मीटर उंच असते आणि अब्राहम यांनी घरी लावलेली प्रजाती सात मीटरची उंची गाठते. हे झाड इडुक्की जिल्ह्यातील अरक्कुलम् गावी आणि कोल्लम जिल्ह्यातील पथणमपूरम तालुक्यात आढळतं. “२०१९ मध्ये कृषी मंत्री व्ही. एस. सुनील कुमार यांनी भेट दिल्यापासनं लोकांचं मूटी पळम् कडे लक्ष गेलंय,” त्यांनी सांगितलं. झाडाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मंत्र्यांसोबत काही संशोधक आले होते. नंतर स्थानिक माध्यमांनी ही बातमी उचलून धरली.

“आदिवासी लोक हे फळ [केरळमध्ये] रस्त्याच्या बाजूने विकतात. ते बाजारात मिळत नाही,” अब्राहम म्हणाले. ग्राहक अब्राहम यांना गाठून “१०० ते १५० रुपये किलोने फळ विकत घेतात आणि म्हणतात की याची चव रामबुतान, ड्रॅगन फ्रूट सारख्या फळांसारखी लागते.” ते या फळांचे शेजारच्या राज्यांमध्ये कुरिअर पाठवतात.

मूटीला भरपूर सूर्यप्रकाश आणि जागेची गरज नसल्यामुळे अल्पभूधारक शिवाय शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी ते लागवडीस योग्य आहे, आणि अब्राहम यांना आशा आहे आहे की आणखी शेतकरी पुढाकार घेऊन ही चटकदार फळांची झाडं लावतील.

Editor's note

जो पॉल सी. एस. हा इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, शिलाँग येथे जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने मूटी  पळम्बद्दल पहिल्यांदा एका स्थानिक शेतकरी मासिकात वाचलं होतं आणि त्याला आणखी जाणून घ्यावंसं वाटलं. तो म्हणतो, "पारी एज्युकेशन सोबत काम करून मला लक्षात आलं की आपण ज्या कहाण्यांकडे बरेचदा दुर्लक्ष करतो त्यांच्यात पुष्कळ बारकावे आणि गुंतागुंत असते. ही कहाणी लिहीत असताना मला पुष्कळ गोष्टींचं ज्ञान झालं."   अनुवादः कौशल काळू